PHOTOS : आदिवासींना रोजगार देणारा आणि बिडी उद्योगाला कच्चा माल देणारा तेंदुपत्ता, पाहा या हंगामातील तोडणीची लगबग…
बिडीचा कच्चा माल कोठून येतो याविषयी तुम्हाला माहिती आहे? चला तर आज आपण या फोटो गॅलरीतून याच विडीच्या कच्चा माल असलेल्या तेंदुपत्ता म्हणजेच बिडीपत्ताच्या मागणी गोष्ट समजून घेऊ.
Follow us
तुम्ही विडी तर पाहिलीच असेल, मात्र ती तयार कशी होते, त्यासाठीचा कच्चा माल कोठून येतो याविषयी तुम्हाला माहिती आहे? चला तर आज आपण या फोटो गॅलरीतून याच विडीच्या कच्चा माल असलेल्या तेंदुपत्ता म्हणजेच बिडीपत्ताच्या मागणी गोष्ट समजून घेऊ.
विडीसाठी लागणारा तेंदुपत्ता म्हणजेच बिडीपत्ता हा प्रामुख्याने जंगलातून गोळा केला जातो. ही पाणं तोडण्यापासून, गोळा करणे, वाळवणे अशी सर्व कामं या जंगलांच्या अवती भोवती राहणारे आदिवासी करतात.
हे काम आदिवासींसाठी काही दिवसांचंच का होईना पण मोठा रोजगार मानला जातो, असं निरिक्षण या गडचिरोली, चंद्रपूर भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आमटे यांनी नोंदवलं.
अनिकेत आमटे यांनी या भागात काम करत असतानाच या भागातील आदिवासींच्या दैनंदिन जगण्याला कॅमेऱ्यात कैद केलंय. सध्या तेंदुपत्ता तोडणीचा हंगाम आहे. त्यामुळे त्यांनी आदिवासींच्या जगण्यात या कामाला किती महत्त्व असतं हेही टिपलंय.
तेंदुपत्ता/बिडी पत्ता सिझन सध्या जोमात सुरू आहे. हा 8-10 दिवसांचा हा सिझन असतो. यातून आदिवासी बांधवांना बऱ्यापैकी रोजगार मिळतो. त्यामुळेच आदिवासी कुटुंबांमधील सर्व लहान मोठे कामाला लागतात.
एकदा का हे बिडी पत्ता तोडणीचं काम सुरू झालं की मग हे 8-10 दिवस आदिवासी पाडे आणि गावांमधील सर्व गावकरी या कामात व्यस्त होतात. सुरुवातील जंगलातील तेंदु झाडाची ही पानं तोडली जातात. दिवसभर ही पानं तोडली की नंतर ही पानं मोजून त्याचे बंडल बांधले जातात.
झाडाची पानं तोडली की ती हिरवीगार असतात. त्यामुळे या तोडलेल्या पानांचे बंडल बांधले की मग त्यांना उन्हामध्ये वाळवण्यासाठी मोकळ्या शेतात ठेवलं जातं. बिडी पत्ता वाळू घालताना देखील मोजून वाळवला जातो. कारण या आदिवासी बांधवांना या पानांच्या संख्येनुसारच पैसे मिळतात.
या कामातून मिळणारे पैसे तसे फार नसतात मात्र कष्ट करुन आयुष्य जगणाऱ्या या आदिवासींसाठी तेही मोलाचे असतात. म्हणूनच ते दरवर्षी या हंगामात शक्य होईल तितके पानं तोडून पैसे जमा करतात. त्यासाठी घरातील प्रत्येक सदस्य या कामात गुंतून जातो.
जंगलातून तोडलेली पानं आणण्यासाठी कुणी सायकलचा वापर करतं, कुणी बैलगाडीचा, तर कुणा मोटरसायकलचा वापर करतं. ज्यांच्याकडे यापैकी कोणतंही साधन नाही असे गरीब आदिवासी डोक्यावर ही पानं वाहतात.
एकदा की ही पानं उन्हात वाळली की मग त्यांना पोत्यात भरुन ठेवलं जातं. त्यानंतर ही पानं विकत घेणारे बिडी कंपनीचे ठेकेदार येऊन ट्रकमध्ये भरुन हा माल विडी कारखान्यात नेतात.