
हुसैन शहीद सुहरावर्दी पाकिस्तानचे पाचवे पंतप्रधान होते. सप्टेंबर 1956 ते ऑक्टोबर 1957 या काळात ते पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले. इलेक्टिव बॉडीज डिस्क्वालिफिकेशन ऑर्डर (EBDO) च्या अंतर्गत त्यांच्यावर प्रतिबंध करण्यात आला. 1960 साली कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

ऑगस्ट 1973 जुलै 1977 या काळात जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले. एका हत्येचा कट रचल्याच्या आरोपखाली सप्टेंबर 1977 त्यांना अटक झाली. पुराव्यांअभावी त्यांची सुटका झाली. पण तीन दिवसांनंतर त्यांना पुन्हा अटक झाली. 4 एप्रिल 1979 ला त्यांना फाशीची शिक्षा झाली.

बेनजीर भुट्टो या दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिल्या. 1985 ला बेनजीर भुट्टो यांना 90 दिवसांसाठी नजरबंद केलं गेलं. 1986 ला त्यांना सरकारवर टीका करण्याच्या आरोपांखाली अटक झाली. तर 1999 साली त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 2007 ला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

2008 ला युसुफ रजा गिलानी हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. भ्रष्टाराचाराच्या आरोपांखाली त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. बनावट कंपन्यांच्या नावावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यांवर ठेवण्यात आला. मग युसुफ रजा गिलानी यांना पंतप्रधानपदावरून दूर व्हावं लागलं.

नवाज शरीफ तीन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिले. 1999 ला कारगिल युद्धात त्यांना आपली सत्ता गमवावी लागली. परवेझ मुशर्रफ सरकारच्या काळात त्यांना 10 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलं होतं. हा कार्यकाळ संपवून ते पाकिस्तानमध्ये आले. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.

शाहिद खाकान अब्बासी हे जानेवारी 2017 ते मे 2018 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले. 2013 मध्ये झालेल्या एलएनजी आयात करारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. जुलै 2019 मध्ये त्यांना अटक झाली. फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना जामीन मिळाला.

तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल 9 मेला अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर इम्रान खान यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.