पिंपरी चिंचवडमधील सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर शिंदे यांनी आकर्षक बेलूर मठाची प्रतिकृती तयार केली आहे. या कलाकृतीसाठी देवदार वृक्षाच्या लाकडाचा वापर त्यांनी केला आहे. बेलूर मठ पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आहे.
सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर शिंदे यांनी तयार केलेली बेलूर मठाची प्रतिकृती सात फूट लांब आहे. तसेच सव्वा तीन फूट रुंद आहे. चार फूट उंच ही प्रतिकृती त्यांनी बनवली आहे. कोलकाता जवळ असलेल्या बेलूर मठाची हुबेहूब साकारलेल्या या प्रतिकृतीची चर्चा होत आहे.
देवदार वृक्षाच्या लाकडात असलेली ही प्रतिकृती बनवण्यासाठी सुधाकर शिंदे यांनी करवत, घासण्या, छोट्या पटाश्या यांचा वापर केला. यामध्ये मुख्य इमारतीची दुमजली वास्तू, अनेक घुमट आणि त्यावरील शिखरे यावर कोरीव काम केले आहे.
बेलूर मठावर असलेल्या नक्षीदार कठड्याचे सज्जे, खिडक्या तर छत रोमनशैलीची आठवण करून देत आहेत. सुधाकर शिंदे यांनी तयार केलेल्या या प्रतिकृतीची नोंद लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
बेलूर मठाची सुधाकर शिंदे यांनी बनवलेली प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातून अनेक जण येत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे. निवृत्त शिक्षक असलेल्या सुधाकर शिंदे यांनी यापूर्वी अनेक ऐतिहासिक वस्तूंच्या प्रतिकृती बनवली आहे.