Duleep Trophy 2024 : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, शुबमन गिलचा संघ 187 धावांनी पिछाडीवर
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघात सामना होत आहे. या सामन्यातील दुसरा दिवसही इंडिया बी संघाच्या मुशीर खानने गाजवला. शतकी खेळीनंतर त्यात आणखी धावा जोडत 181 धावा केल्या. तसेच पहिल्या डावात 321 धावा केल्या.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सुरु असलेल्या इंडिया ए आणि इंडिया बी संघाच्या सामन्याचा दुसरा दिवस संपला. दुसऱ्या दिवसावर अभिमन्यू ईश्वरनच्या संघाने पकड मिळवली. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा इंडिया बी संघाच्या हातात तीन विकेट होत्या. मुशीर खान आणि नवदीप सैनी ही जोडी जमली होती. असं वाटलं की सकाळच्या सत्रात तीन झटपट बाद होतील. पण तसं काही झालं नाही. या दोघांनी शुबमन गिलच्या संघाला चांगलंच झुंजवलं. लंच ब्रेकपर्यंत ही जोडी मैदानात होती. तसेच आठव्या विकेटसाठी या जोडीने 205 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे शुबमन गिलच्या संघाचे गोलंदाज पुरते हतबल झाले होते. पण ही जोडी फोडण्यात कुलदीप यादवला यश आलं. त्याच्या पहिल्या चेंडूवर मुशीर खानने षटकार मारला होता. तसाच प्रयत्न दुसऱ्यांदा करताना बाद झाला. सीमेरेषेजवळ रियान परागने त्याचा झेल घेतला. मुशीर खान बाद झाल्यानंतर नवदीप सैनीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांच्या खेळीमुळे टीम इंडिया बी संघाला 10 गडी बाद 321 धावांपर्यंत मजल मारता आली.
इंडिया बी संघाने पहिल्या डावात केलेल्या धावांचा पाठलाग करताना इंडिया ए संघाने सावध सुरुवात केली. मयंक अग्रवाला आणि शुबमन गिल यांनी 57 धावांची भागीदारी केली. पण नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर शुबमन गिलचा त्रिफळा उडाला. 43 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्याने तीन चौकार मारले. तर मयंक अग्रवालही जास्त काळ तग धरू शकला नाही. त्याने 45 चेंडूत 36 धावा केल्या आणि नवदीपच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रियान पराग नाबाद 27, तर केएल राहुल नाबाद 23 धावांवर खेळत आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया ए संघाने 2 गडी बाद 134 धावा केल्या आहेत. अजूनही शुबमन गिलचा संघ 187 धावांनी पिछाडीवर आहे. इंडिया ए संघाकडून आकाश दीपने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर खलील अहमदने 2, आवेश खानने 2, तर कुलदीप यादवने 1 गडी बाद केला.