न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावल्याचं दिसत आहे. कारण पहिल्या डावात भारताचा संपूर्ण संघ फक्त 46 धावांवर बाद झाला आहे. या डावात भारताच्या पाच फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. पण अपेक्षाभंग झाला.
विराट कोहली आठ वर्षानंतर तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरला होता. शुबमन गिल या कसोटीत नसल्याने विराट कोहली तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तसेच सरफराज खानला चौथ्या स्थानावर पसंती दिली गेली.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला. पण 9 चेंडूंचा सामना करत खातंही न खोलता तंबूत परतला. विलिय ओराउरकेच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला. उसळी घेतलेला चेंडू कोहलीच्या ग्लव्ह्जला लागला आणि गलीला क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सच्या हाती गेला.
विराट कोहली यापूर्वी 2016 मध्ये तिसर्या स्थानावर फलंदाजीला उतरला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. तेव्हा त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 धावा केल्या होत्या.
2016 पूर्वीही विराट कोहली तीन कसोटी सामन्यात तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तेव्हा त्याला अर्धशतकी खेळीही करता आली नाही. 2012 मध्ये तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तेव्हा इंग्लंडविरुद्ध 13 धावांची नाबाद खेळी केली होती.
2013 मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 34 धावा केल्या होत्या. 2013 मध्ये दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 41 धावांची खेळी केली होती.