पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या अस्थिरता आहे. परिस्थिती अशी आहे की इथे काहीही होऊ शकतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. जका अश्रफ यांनी काही दिवसांआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चेयरमनपदाची जबाबदारी स्वीकारली. जका अश्रफ आता मोठा निर्णय घेऊ शकतात.
'द इंटरनॅशनल न्यूज' यांच्या रिपोर्टनुसार, पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डने टीमसाठी हेड कोच आणि सपोर्ट स्टाफसाठी शोधाशोध सुरु केली आहे.
रिपोर्टनुसार, पाकिस्तान टीम डायरेक्टर मिकी आर्थर, हेड कोच ग्रांट ब्रेडबर्न हे दोघे जका अश्रफ यांच्या एन्ट्रीनंतर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. नजीम सेठी पीसीबी चेयरमन असताना आर्थर हे पासीबीसह जोडले गेले होते.
आर्थर यांची एप्रिल 2023 मध्ये टीम डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आर्थर यांना पदभार स्वीकारुन 4 महिनेच झालेत. तर मे 2023 मध्ये ब्रेडबर्न यांना हेड कोच म्हणून जबाबदारी दिली गेली. ब्रेडबर्न यांची एकूण एकूण 2 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. मात्र ब्रेडबर्न त्याआधीच पायउतार होण्याची चिन्हं आहेत.
तर पाकिस्तान क्रिकेट टीम माजी कर्णधार मिस्बाह उल हक याच्याकडे टेक्निकल कमिटीची सूत्रं आहेत. टीमच्या उज्जवल भविष्याची जबाबदारी ही या टेक्निकल कमिटीकडे असते. तर माजी सलामीवीर मोहम्मद हफीज याची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाऊ शकते.