रिकी पाँटिंग मुख्य प्रशिक्षक बनताच हे दिग्गज पंजाब किंग्जमधून ‘आऊट’, लिलावापूर्वी अशी झाली उलथापालथ
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी सर्वच फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. मेगा लिलाव पार पडणार असून बरीच खलबतं सुरु आहेत. त्यात कोचिंग आणि सपोर्ट स्टाफमध्ये उलथापालथ पाहायला मिळत आहे. पंजाब किंग्ज संघातही काही वेगळं चित्र नाही. रिकी पाँटिंग याची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर लगेच संघात काही बदल करण्यात आले आहेत.
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझी कामाला लागल्या आहेत. खासकरून जेतेपदाची चव न चाखलेल्या फ्रेंचायझींमध्ये बरीच उलथापालथ सुरु आहे. पंजाब किंग्ज फ्रेंचायझीने 18 सप्टेंबरला मुख्य प्रशिक्षकपदी रिकी पाँटिंगची नियुक्ती केली आहे. त्यानंतर आठ दिवसात दोन दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे.
2 / 5
पंजाब किंग्जचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट संजय बांगर आणि मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, हा निर्णय बोर्ड सदस्यांनी एका बैठकीनंतर घेतला आहे. यात संघाचे चार सहमालक सहभागी होते.
3 / 5
पंजाब किंग्सची आयपीएलमधील कामगिरी एकदम निराशाजनक राहिली आहे. गेल्या 10 वर्षात संघाने एकदाही प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेलं नाही. ट्रेवर बेलिस मुख्य प्रशिक्षकपदी असताना ही कामगिरी अजून ढासळली. आयपीएल 2024 मध्ये तर पंजाबचा संघ नवव्या स्थानावर होता.
4 / 5
संजय बांगर 2014 ते 2016 पर्यंत पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक होते. 2021 मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाजी सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. आरसीबीने मुख्य प्रशिक्षक म्हणून बढती दिली. 2023 मध्ये पुन्हा पंजाब किंग्जसोबत क्रिकेट संचालकाच्या भूमिकेत राहिला. बांगरच्या काळात पंजाबच्या कामगिरीत काही विशेष फरक पडला नाही.
5 / 5
प्रीती झिंटाचा संघ शेवटचा 2014 मध्ये आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. मात्र, अद्याप एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. संघाचा विजयाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी आणि ट्रॉफीच्या शोधात फ्रँचायझीने गेल्या 10 वर्षांत 7 प्रशिक्षक बदलले आहेत.