
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. आता पाकिस्तान आणि श्रीलंकेतील विजयी संघ भारताशी भिडणार आहे. दुसरीकडे, पावसाने व्यत्यय आणला तर मात्र श्रीलंकेला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल हे निश्चित आहे. 17 सप्टेंबरला कोलंबोमध्ये अंतिम सामना होणार आहे.

आशिया कप 2023 स्पर्धेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. पण या मालिकेसाठी अजून टीम इंडियाची घोषणा झालेली नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका 22 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर संघाची घोषणा केली जाईल, असं सांगण्यात येत आहे. तसं पाहिलं तर आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपसाठी तोच संघ आहे. त्यामुळे त्यात काही बदल होईल असं वाटत नाही.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतही संजू सॅमसनला स्थान मिळणार नाही, हे निश्चित आहे. आशिया कप स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून त्याचं नाव होतं. पण आता तो माघारी परतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी मिळणार नाही, असंच म्हणावं लागेल.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइटस्पोर्ट्सला सांगितलं की, "केएल राहुल पूर्णपणे फीट आहे. त्यामुळे संघात तीन यष्टीरक्षकांची गरज नाही. त्यामुळे संजू सॅमसनला संधी मिळणं कठीण आहे. केएल राहुल मुख्य यष्टीरक्षक असेल आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतही दिसणार आहे."

श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत चिंता आहे. त्यामुळे आता आशिया चषकाच्या उर्वरित सामने आणि वर्ल्डकपमध्ये खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. अय्यरची दुखापत गंभीर आहे की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

श्रेयस अय्यर आशिया कप 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध् खेळला. अवघे 9 चेंडू खेळत तंबूत परतला. अय्यर सध्या कोलंबोमध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. अय्यर ऐवजी संघात सूर्यकुमार यादव असल्याने काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.