राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा, अनेकांचे भवितव्य मतपेटीत
राज्यातील 2359 ग्रामपंचायत निवडणुकीचा आज धुराळा उडाला. सकाळपासूनच राज्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी लगबग सुरु होती. ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
राज्यात काही ठिकाणी मतदान शांततेत पार पडत आहे. तर काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागलं आहे. कुठे राडा झाला आहे. कुठे भानामतीचा प्रकार समोर आला आहे. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी मतदानात हिरारीने सहभाग नोंदवला.
मिरज तालुक्यातील संवेदनशील असलेल्या नांद्रे या गावी मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.अभिजीत सकळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे संदीप पाटील याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवेत भानामतीचा प्रकार समोर आला. उमेदवारांचे फोटो, लिंबू आणि बाहुली असं साहित्य मतदान केंद्राबाहेर टाकण्यात आलं होतं. मतदानाच्या काही तास आधीच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.
नाशिकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच दोन गट भिडले. काल रात्री इगतपुरीतील धारगाव उमदेवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. रंजन गोर्धने हे रस्त्यात उभे असताना रात्री 8 च्या सुमारास हा हल्ला झाला आहे
बारामतीच्या काटेवाडीत मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. गावात रात्री अडीचशे रुपये देऊन मते विकत घेल्याचा आरोप भाजपचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी केला आहे. विकास कामात खाल्लेले हे पैसे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच बारामतीत सुविधांचा अभाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची ही पहिलीच निवडणूक आहे.त्यामुळे सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोर लावला आहे. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पण तापलेला आहे.
राज्यातील दिग्गज नेत्यांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली. ग्रामपंचायत निवडणुकीत दबदबा कायम राहावा आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नेते सकाळीच त्यांच्या गावात, मतदान केंद्रावर पोहचले आहे. सहपरिवार, कुटुंब, कार्यकर्त्यांसह त्यांनी मतदान केले. मंत्री, आजी-माजी आमदार, खासदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्वच जण आवाहन करत आहे.