कोरोनाच्या संकट कमी होत असताना पुण्यातील नाट्यसृष्टी पुन्हा एकदा सुरु झाली आहे. कोरोना नियमावलीची अंमलबजावणी करत नाटकांना सुरुवात झाली आहे.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी कोरोनानंतरचा पहिला प्रयोग संपन्न झाला. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाने पुण्यातील नाट्यसृष्टी ‘अनलॉक’ झाली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बैठक व्यवस्थेसह इतर बाबींची अंमलबजावणी केली असतानाही नाट्यप्रेमींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. प्रयोगाच्या सुरुवातीला रंगदेवतेला नमन करून ‘नाट्यक्षेत्राला पुन्हा उभारी दे’ असे साकडे घातले गेले.
नाट्यप्रयोगाला प्रशांत दामले, कविता लाड, मोहन जोशी, सतीश आळेकर, उल्हासदादा पवार, केशव उपाध्ये, सलील कुलकर्णी, बेला शेंडे, ऋषीकेश रानडे, पृथ्वीराज सुतार, अमोल रावेतकर यांच्यासह नाट्यप्रेमी आणि रसिकांची उपस्थिती होती.
नाट्यप्रयोग सुरु होण्याअगोदर नाट्यगृहाची साफसफाई करण्यात आली होती. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.