सांगली : द्राक्ष हंगामाची सुरवात आणि शेवटही निसर्गाच्या लहरीपणात गेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उत्पादनात घट झाली आहे. दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा असतोच यंदा मात्र, सर्व हंगामाच अवकाळीने हिसकावला आहे. द्राक्ष उत्पादनात घट आणि दर्जा ढासळल्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवर भर दिला होता. पण हे देखील नियतीला मान्य नाही. कारण जिल्ह्यात बेदाणा निर्मीती सुरु असतानाच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वकाही उध्वस्त झाले आहे. बेदाणा निर्मितीसाठी उभारण्यात आलेले शेड हे जमिनदोस्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात बेदाणा शेडचे पत्रे तर उडून गेलेच पण येथे कामास असलेल्या महिला मजूरही जखमी झाल्या आहेत.