बिहार विधानसभा निवडणुकीत पुष्पम प्रिया चौधरी, लव सिन्हा, पप्पू यादव, लवली आनंद आणि सुभाषिनी बुंदेला हे उमेदवार सुद्धा चर्चेत राहिले आहेत. हे पाचही जण बिहार निवडणुकीत हवा निर्माण करण्यात यशस्वी झाले असले तरी निवडणूक मात्र त्यांना जिंकता आली नाही.
पुष्पम प्रिया चौधरी यांनी तर स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. प्लुरल्स पार्टीच्या नेत्या असलेल्या पुष्पम प्रिया या दोन विधानसभा मतदारसंघातून उभ्या होत्या. त्या एकाही ठिकाणी निवडून येऊ शकल्या नाहीत. एका मतदारसंघात तर त्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली.
काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव सिन्हाही या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी होते. ते बांकीपूरमधून उभे होते. ते 39 हजार 36 मतांनी पराभूत झाले.
प्रगतीशील लोकतांत्रिक आघाडीचे उमेदवार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव यांनाही मधेपुरा विधानसभा मतदारसंघातून पराभूत व्हावं लागलं. यादव सुद्धा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून चर्चेत होते.
आरजेडीचे स्टार प्रचारक आणि बाहुबली आनंद सिंह यांची पत्नी लवली आनंद यांनी सुद्धा या निवडणुकीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र त्या 19 हजार 679 मतांनी पराभूत झाल्या.
शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी बुंदेला यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या काँग्रेसमधून उभ्या होत्या. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यासाठी सभा घेऊन भावनिक आवाहन केलं होतं. त्याचाही फारसा परिणाम झाला नाही.