भाज्या व फळं जास्त काळ टिकून रहावीत यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण त्या आपण फ्रीजमध्येही ठेवतो. फ्रीजमधील अनेक गोष्टी जास्त काळ खराब होत नाहीत. पण सर्वच फळे आणि भाज्या फ्रीजसाठी बनवल्या जात नाहीत. काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव आणि पोत बदलतो. कोणत्या भाज्या फ्रीजमध्ये ठेऊ नयेत हे जाणून घेऊया.
टोमॅटो - अनेकांना टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवायला आवडतात. पण तसे करू नये कारण जेव्हा टोमॅटो थंड तापमानाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांची चव आणि पोत खराब होण्याची शक्यता असते. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी बाहेर सामान्य तापमानात ठेवावेत.
केळी - केळं हे असे फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवू नये. थंड तापमानामुळे केळीची साले काळी पडू शकतात, त्यामुळे ती आंबट होऊ शकतात. केळी उन्हापासूनही लांब सावलीत ठेवावीत.
ॲव्हाकॅडो - ॲव्हाकॅडो पिकेपर्यंत खोलीत सामान्य तापमानात ठेवणे चांगले असते. एकदा ते पिकले की काही दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. पण जर कच्चं ॲव्हाकॅडो फ्रीजमध्ये ठेवलं तर ते पूर्णपणे पिकत नाही.
बटाटा - बटाटे हे देखील फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. त्यांना कोरड्या जागी ठेवणे केव्हाही चांगले. जर तुम्ही बटाटे फ्रीजमध्ये ठेवले तर त्यांचा पोत बदलू शकतो.
कांदा - कांद्याला हवेशीर पण थंड आणि कोरड्या जागेची आवश्यकता असते. कांदे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यात ओलावा येऊ शकतो आणि त्यांना बुरशी लागू शकते.