‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत गुरुवारी भाजप आध्यात्मिक आघाडीकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.
या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण, तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.
त्यानंतर नगर परिषदेने आंदोलन स्थळावरील तंबू रातोरात उखडून टाकले. तसेच तुषार भोसले यांना तुळजापूर पोलिसांनी नोटीसही बजावली.
इतकंच नाही तर तुळजापूर मंदिर परिसरात जमावबंदी लागू केली. त्यामुळे तुषार भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात करत सरकारची तुलना मुघलांशी केली.
राज्यातील ठाकरे सरकार हे मोगलांपेक्षा वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळं सरकार असल्याची टीका भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे.
आंदोलन स्थगित केलं नाही तर पुढील 15 दिवस तुळजापूरमध्ये कलम 144 लागू करु, अशा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती तुषार भोसले यांनी दिली.
त्यामुळे परिसरातील व्यापारी आणि तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.