घरट्यात परतताना पक्षांचा किलकिलाट, मगरदर्शन, पाण्यात उड्या मारणारे मासे, तीक्ष्ण नजरेने एका सूरउडीत माशांची शिकार करणारे किंगफिशर.
बोटिंग, उंच उंच झोका, विविध खेळ सोबत सुमधुर गाणी आणि बरंच काही या ठिकाणी अनुभवता येतं.
शहर आणि गर्दीपासून दूर निवांत असं जगबुडी नदीवरील दाभोळ खाडी किनारी वसलेलं हे ठिकाण म्हणजे तुंबाड गाव.
सध्या या गावात पर्यंटकांचा खास कोकणी पाहुणचार घेणारं “तुंबाड किनारा” रिसॉर्ट अनेकांचं आकर्षणाचं ठिकाण ठरतंय.
ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांनी साकारलेली ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीतील अनेक गोष्टी पर्यटकांना येथे पाहायला मिळतात.
विशेष म्हणजे ही कादंबरी ज्या घरात आणि अंगणात साकारली ती वास्तू, वातावरण अनुभवण्यासाठीही अनेक पर्यटक वाट चुकवून या ठिकाणी येत आहेत.
पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या अनिश्चिततेच्या छायेत जाण्यापूर्वी पुढील अस्वस्थतेला सामोरे जाण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहे. इथे या आणि फ्रेश व्हा, असं आवाहन करणारं खास कोकणी आमंत्रण तुम्ही स्वीकारलं तर कोकणवासी तुमच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचंही इथं पाहायला मिळतं.
त्यामुळे तुंबाडची रम्य संध्याकाळ आणि आकाशातील रंगांची उधळण पाहण्यासाठी तुंबाडला भेट देण्याचा विचार करत असाल तर कोकणात आपलं स्वागत आहे. त्यासाठी तुंबाड हे उत्तम ठिकाण आहे.
संध्याकाळची आकाशातील रंगाची उधळण अनुभवल्यावर त्याच ठिकाणी अनुभवलेली धुक्याची चादर लपेटलेली सुंदर सकाळ आणि हळूच उबदार दिवसाची सुरुवात करून देणारा निसर्ग तर अगदी मनभरुन आनंद देतो.
हा आनंद अनुभवायचा असेल तर तुंबाडला आवर्जून भेट देण्याचं आवाहन तुंबाड किनारा रिसॉर्टचे संचालक सुनिता गांधी (7218894823) आणि महेंद्र इंदुलकर (9307266258) यांनी केलं आहे. “येवा कोकण आपलाच असा”.