नागपूरमधील विचरवंत, लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी मध्यरात्री वीरा साथीदार यांनी अखेरचा श्वास घेतला. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. तर गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
मूळ वर्धा जिल्ह्यातील असलेले वीरा साथीदार हे नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत लहानाचे मोठे झाले. घरी अठरा विश्व गरिबी असतानाही आईने त्यांना शिकण्याचं बळ दिलं. त्यांचे वडील नागपूरच्या रेल्वे स्थानकावर हमाली, तर आई बांधकाम मजूर म्हणून काम करत असे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता. ते स्वत: गीतकार, पत्रकार होते. आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली होती. विविध ठिकाणी ते मार्गदर्शनपर व्याख्याने द्यायचे. पुढे पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.
62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला होता. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होता. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका त्यांनी साकारली होती.
राष्ट्रीय पुरस्कारावर यश संपादन करणाऱ्या‘कोर्ट’ या चित्रपटाने नंतर ‘ऑस्कर’चा उंबरठा गाठला. ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारतातर्फे या चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली. ऑस्करच्या ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या विभागासाठी ‘कोर्ट’ निवडला गेला होता .