दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला दिनाचे औचित्य साधत एका महिलांच्या ग्रुपने चक्क नऊवारी साडी परिधान करत रॅपलिंगचा थरार अनुभवला. आधी घाम काढणारी चढाई आणि मग रॅपलिंगचा थरार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नऊवारी परिधान करून या महिलांनी लोणावळा आणि खंडळाच्या कुशीत नागफणी सुळक्याकडे कूच केली. सुरुवातीला झुडपं असल्याने आरामात चढाई झाली.
पण नंतर मात्र महिलाचा कस लागला. घनदाट झाडी, निसरडी वाट अन सोसाट्याचा वारा झेलत महिलांनी निम्मी वाट पार केली.
तासभर घाम गाळून सर्व महिला नागफणी सुळक्याच्या वर पोहोचल्या. त्यामुळे हा पहिला टप्पा पूर्ण झाला. पण त्यानंतर या महिलांचा खरा थरार सुरु झाला.
हा थरार म्हणजे रॅपलिंग....तीनशे फुटी हा सुळका रोपच्या सहाय्याने खाली उतरण्यापूर्वी महिलांची घाबरगुंडी उडाली होती.
चहू बाजूंनी दरी, सोसाट्याचा वारा आणि उभी कातळकडा ही आवाचून उभी होती. त्यामुळे महिलांची धडधड आणखी वाढली.
यानंतर दीडशे फूट रॅपलिंग केल्यावर कातळकडेचा आधार सुटतो. मग जीव मुठीत येतो. तिथून रोपला लोंबकळत खाली आलं की जीव भांड्यात पडतो. असेच काहीसं या महिलांचे झाले होते.
सध्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. त्याही पुरुषांप्रमाणे थ्रील अनुभवू शकतात, हेच दाखवण्यासाठी इंडिया ट्रेक्सने याचे आयोजन केले होते.
या ट्रेकींगमध्ये 20 ते 25 महिला सहभागी झाल्या होत्या.
विशेष म्हणजे एक चिमुरडीही चक्क नऊवारी साडी घालून सहभागीझाली होती.