आजकाल प्रत्येकालाच फिरायला आवडतं. मग अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, फॅमिली सोबत किंवा आपल्या लाईफ पार्टनर सोबत फिरायला जाण्यासाठी प्लान करतातच. तर अशाच पर्यटन प्रेमींसाठी आम्ही काही अशी ठिकाणे सांगणार आहोत, जी त्यांच्या अनोख्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहेत. तसेच आम्ही तुम्हाला जगातील त्या शहरांची नावे सांगणार आहोत, जी कलरफुल डेस्टिनेशनच्या नावाने प्रसिद्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया या सुंदर ठिकाणांबद्दल..
बुरानो, इटली: - बुरानो हे असे ठिकाण आहे की तिथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरांना रंग देण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. याचं कारण असं की, लोकांनी त्यांच्या घरांना समान प्रकारचे पेंट करू नये. त्यामुळे बुरानोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगांची कलरफुल घरे बघायला मिळतील.
कोपनहेगन, डेन्मार्क:- डेन्मार्क हा देश जगातील सर्वात आनंदी देशांपैकी एक आहे. डेन्मार्कमध्येही बुरानो प्रमाणेच रंगीबेरंगी इमारती पाहायला मिळतात. तसंच तेथे असलेल्या रंगीबेरंगी इमारती कोपनहेगनच्या सौंदर्यात भर घालतात.
हवाना, क्युबा:- 1982 मध्ये क्युबाच्या हवाना शहराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. हवाना शहरामध्ये अरुंद गल्ल्यांमधील रंगीबेरंगी इमारती अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसतात.
जोधपूर, भारत:- जगातील प्रसिद्ध असलेल्या रंगीबेरंगी डेस्टिनेशनमध्ये भारताच्या ब्लू सिटीचं नाव देखील समाविष्ट आहे. राजस्थानचे जोधरपूर हे ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते. जोधपूरमध्ये असलेली निळी घरे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात. त्यामुळे या ब्लू सिटीमध्ये येणारा पर्यटक तिच्या प्रेमात पडतोच.