मोबाईल खरेदीत पंकजांकडून 106 कोटींचा घोटाळा, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि त्यांची बहीण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं वैर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण धनंजय मुंडेंनी निवडणुका तोंडावर असताना त्यांच्या बहिणीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप केलाय. मोबाईल खरेदीमध्ये पंकजांनी 106 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. शिवाय आमचा संवाद आता संपला असल्याचं दुःख असल्याचंही […]
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि त्यांची बहीण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं वैर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण धनंजय मुंडेंनी निवडणुका तोंडावर असताना त्यांच्या बहिणीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप केलाय. मोबाईल खरेदीमध्ये पंकजांनी 106 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. शिवाय आमचा संवाद आता संपला असल्याचं दुःख असल्याचंही ते म्हणाले.
टीव्ही 9 मराठीच्या एन्काऊंटर या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी अनेक आरोप केले. शिवाय कौटुंबीक संबंध आता संपले असल्याचंही ते म्हणाले.
पंकजा मुंडेंवर पुन्हा एकदा घोटाळ्याचा आरोप
पंकजा मुंडेंच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने 30 जिल्ह्यातील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रांसाठी जवळपास लाखभर मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. बंगळुरू स्थित एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा 17 हा मोबाईल खरेदी करण्यात येणार आहे. संगणक माहिती सक्षम रिअल-टाईम मॉनिटरींग (आयसीटी-आरटीएम) योजनेसाठी स्मार्टफोन्स खरेदी करण्यात येत आहेत. याबाबतचा सरकारी अध्यादेश (जीआर) 28 फेब्रुवारी 2019 रोजी काढण्यात आला. हे मोबाईल सिम कार्ड आणि डेटा प्लॅनसह अंगणवाडी सेविकांना वितरित करण्यात येणार असल्याचं निर्णयात म्हटलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय. राज्यातल्या 16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार मी बाहेर काढलाय, त्यात दुर्दैवाने माझ्याही बहिणीचं नाव असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला.
“आमच्यातला संवाद संपला”
दरम्यान, पंकजा यांच्यासोबत संवाद होत नसल्याबद्दल धनंजय मुंडेंनी खंत व्यक्त केली. आमच्यात संवाद असायला हवा. पंकजा सुख-दुःखात येतात. पण माझ्या भावाच्या लग्नासाठी आल्या नाही याचं वाईट वाटलं. त्या आल्या तरच संवाद होऊ शकतो. आमच्यातले मतभेद आता राजकारणाच्या पलिकडे गेलेत. त्यामुळेच संवाद संपलाय, असं धनंजय मुंडे म्हणाले.
“… म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटतो”
धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांसोबत सेटिंग असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. यावरही धनंजय मुंडेंनी उत्तर दिलं. मी मुख्यमंत्र्यांकडे सेटिंगसाठी नाही, तर लोकांच्या समस्या गेऊन जातो, असं ते म्हणाले. शिवाय राष्ट्रवादी सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मी मरण पत्करेन, पण ज्या भाजपने मला हाकलून दिलं, त्यांच्याकडे परत जाणार नाही, असं ते म्हणाले.
बीड जिल्ह्यातील राजकारणात सध्या स्वपक्षीयांकडून आणि विरोधकांकडूनही धनंजय मुंडेंची कोंडी सुरु आहे. यावर उत्तर देताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. जयदत्त क्षीरसागर सध्या राष्ट्रवादीत असून भाजपसाठी कामं करतात आणि मी बोललो तर माझ्यावर आरोप करतात, अशी टीका त्यांनी केली. शिवाय माझी पंकजांसोबत स्थानिक पातळीवर सेटिंग आणि राज्य पातळीवर विरोध हे पूर्णपणे खोटं असल्याचंही ते म्हणाले.
“प्रकाश आंबेडकरांनी भाजपला मदत करायचीय”
वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत. पण भारिपचे प्रकाश आंबेडकर यांना भाजपला मदत करायची आहे, त्यामुळे काँग्रेसकडे अटी घालायच्या म्हणून घालतात, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला. काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानिक कक्षेत आणण्यासाठी तयार आहे, पण आता तरी आंबेडकर आमच्यासोबत येणार का, असाही प्रश्न त्यांनी विचारला.