12 आमदारांची यादी राजभवनात ‘सुरक्षित’; संजय राऊतांच्या टीकेनंतर सूत्रांची माहिती
राज्यपालांना दिलेली 12 आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. | 12 MLC Bhagat Singh Koshyari
मुंबई: राज्यपालनियुक्त 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राज्यपालांना दिलेली 12 आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यानंतर आता 12 आमदारांची यादी राजभवनात (RajBhavan) सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Politics over BJP and Mahavikas Aghadi govt over 12 MLC appointment by Bhagat Singh Koshyari)
गेल्यावर्षी 6 नोव्हेंबरला महाविकासघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत चकार शब्दही काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावाचा यादी मागितली होती.
मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावरुन राजकारण सुरु झाले होते. अखेर गोपनीयतेच्या कारणामुळे राजभवनाला ही यादी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सचिवालयाकडून देण्यात आले होते. मात्र, आता 12 आमदारांची ही यादी राजभवनातच असल्याने राज्यपाल कोश्यारी त्याबाबत काही निर्णय घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे उच्च न्यायालयानेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
‘सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच’
12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी सोमवारी राज्यपालांना टोला लगावला होता. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकही 24 तासांत केला होता. पण सहा महिने उलटले तरी राज्यपालांचं नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत संशोधन सुरूच आहे, अशी टिप्पणी राऊत यांनी केली होती.
संबंधित बातम्या:
संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले
राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, शिवसेनेचं टीकास्त्र
सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच; राऊतांची खोचक टीका
(Politics over BJP and Mahavikas Aghadi govt over 12 MLC appointment by Bhagat Singh Koshyari)