मुंबईत सहा जागांसाठी तब्बल 156 उमेदवार रिंगणात
मुंबई : मुंबईत लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. मुंबईत चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होत असून, निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल होती. मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य), मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) आणि मुंबई उत्तर मध्य या सहा लोकसभा मतदारसंघासाठी यंदा […]
मुंबई : मुंबईत लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. मुंबईत चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होत असून, निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल होती. मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य), मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) आणि मुंबई उत्तर मध्य या सहा लोकसभा मतदारसंघासाठी यंदा तब्बल 156 उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबईत यंदा सर्वात जास्त उमेदवार उभे आहेत. उत्तर पूर्व मुंबईसाठी एकूण 33 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उत्तर पूर्व मुंबईनंतर दक्षिण-मध्य मुंबईमध्ये 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.
मुंबईतील इतर लोकसभा मतदारसंघातही अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये उत्तर मुंबईत 22, उत्तर पश्चिम मुंबईत 27, उत्तर मध्य मुंबईत 27 आणि दक्षिण मुंबईमध्ये 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मुंबईतील सहा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण लढती
मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या मुंबई उत्तरमध्ये विद्यमान खासदार भाजपचे गोपाळ शेट्टी आहेत. पण उर्मिला मातोंडकर यांना प्रचारात मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे गोपाळ शेट्टी यांच्यासमोर नव्हे आव्हान उभं राहिलं आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आणि काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार गजानन कीर्तिकर आणि संजय निरुपम यांच्यामध्ये ही महत्त्वपूर्ण लढत होणार आहे.
उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य) मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपा या दोघांमध्ये कडवी लढत होत आहे. राष्ट्रवादीने माजी खासदार संजय दिना पाटील यांना उत्तर मुंबईत तिकीट दिलं आहे, तर भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांचे तिकीट कापून नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर-मध्य मुंबईत भाजप आणि काँग्रेसमधील दोन बड्या महिला उमेदवारांमध्ये महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. भाजपमधून विद्यमान खासदार पूनम महाजन, तर काँग्रेसकडून माजी खासदार प्रिया दत्त उत्तर-मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसकडून माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. संजय भोसले या तिघांमध्ये महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. सध्या दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवेसनेकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत, काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. अनिल कुमार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत. या मतदारसंघात मिलिंद देवरा आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यात कडवी लढत होणार आहे.
चौथ्या टप्प्यासाठी 9 एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, तर 10 एप्रिलला अर्जाची छाननी केली जाणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत 12 एप्रिलपर्यंत आहे. मुंबईच्या सर्व सहा लोकसभा मतदारसंघाचे मतदान 29 एप्रिलला होणार आहे. मुंबई शहरातील 527 मतदान केंद्रामधून 2 हजार 601 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल.