21 उमेदवार जाहीर, पण शिवसेनेने या दोन जागा राखून का ठेवल्या?
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. शिवसेना महाराष्ट्रात 23 जागा लढवणार आहे. त्यापैकी 21 जागा शिवसेनेने आज जाहीर केल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांनी आपापल्या यादी जाहीर केल्यानंतर आज शिवसेनेनेही यादी बाहेर काढली. शिवसेनेने आज बहुतेक सर्व जागा जाहीर केल्या, मात्र 2 जागा राखून ठेवल्या. या दोन […]
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. शिवसेना महाराष्ट्रात 23 जागा लढवणार आहे. त्यापैकी 21 जागा शिवसेनेने आज जाहीर केल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांनी आपापल्या यादी जाहीर केल्यानंतर आज शिवसेनेनेही यादी बाहेर काढली.
शिवसेनेने आज बहुतेक सर्व जागा जाहीर केल्या, मात्र 2 जागा राखून ठेवल्या. या दोन जागांमध्ये पालघर आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
पालघरची घोषणा नाही
पालघरची जागा शिवसेनेने भाजपकडून मागून घेतली आहे. इथे सध्या काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राजेंद्र गावित हे खासदार आहेत. पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचे दिवंगत खासदार चिंतामन वानगा यांचे सुपुत्र, शिवसेना उमेदवार श्रीनिवास वानगा यांचा पराभव केला होता.
यंदा शिवसेनेने पालघरची जागा भाजपकडे हट्टाने मागून घेतली आहे. तिथे पुन्हा शिवसेना श्रीनिवास वानगा यांनाच उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. मात्र अद्याप या जागेची घोषणा शिवसेनेने केली नाही.
सातारा लोकसभा
शिवसेनेने आज सातारा लोकसभा मतदारसंघाचीही घोषणा केली नाही. साताऱ्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना कोणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता राज्यभरात आहे.
साताऱ्यात नरेंद्र पाटील शिवसेनेचे उमेदवार?
शिवसेनेकडून सातारा लोकसभेसाठी सध्या दोन नावं चर्चेत आहेत. पहिलं नाव आहे पुरुषोत्तम जाधव यांचं तर दुसरं नाव आहे भाजपच्या नरेंद्र पाटील यांचं.
युतीमध्ये सातारा लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नरेंद्र पाटील या जागेसाठी उत्सुक आहेत. नरेंद्र पाटील यांनी आजच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन भेट घेतली. नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे नरेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करुन साताऱ्याची उमेदवारी मिळवणार की शिवसेना नरेंद्र पाटलांच्या उमेदवारीसाठी भाजपला जागा सोडणार हा प्रश्न आहे.
पुरुषोत्तम जाधवही साताऱ्यात इच्छुक
साताऱ्यात पुरुषोत्तम जाधव यांनी 2009 मध्ये शिवसेनेतून तर 2014 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. त्यांनी 2009 मध्ये 2 लाख 35 हजार मते, तर 2014 मध्ये अपक्ष असूनही 1 लाख 55 हजार मते मिळवली.
पुरुषोत्तम जाधव यांनी युतीकडून तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून पुन्हा एकदा पुरुषोत्तम जाधव यांच्याही नावाची चर्चा आहे.
संबंधित बातम्या
उदयनराजेंविरोधात युतीचा उमेदवार कोण?
लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी जाहीर