मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या (ST Corporation) सुमारे 4 हजार 700 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Adv. Anil Parab) यांनी केली. परब म्हणाले, दिनांक 6 जुलै ते 14 जुलै, 2022 दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी दि. 8 जुलै रोजी 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही परब यांनी केले.
#आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर ला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी दि. ६ ते १४ जुलै दरम्यान #एसटी महामंडळाच्या सुमारे ४७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री @advanilparab यांनी केली. #वाखरी येथील रिंगण सोहळ्यासाठी २०० बसेस असतील, असेही ते म्हणाले. pic.twitter.com/JlUXSWXuWN
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 15, 2022
गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहोळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एस महामंडळावर आहे.म्हणून पंढरपूर यात्रेसाठी सुमारे 4 हजार 700 गाड्या सोडण्यात येणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.
औरंगाबाद -1200, मुंबई -500, नागपूर- 100, पुणे -1200, नाशिक-1000 तर अमरावती येथून 700 अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पंढरपूर येथे यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे बस स्थानके व जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
याप्रमाणे बस सेवासुरू करण्यात येणार आहे.