ठाणे, कल्याण, भिवंडीतून लोकसभा लढणारे 41 टक्के उमेदवार दहावी नापास
ठाणे : सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. गेल्या काही दिवासांपासून लोकसभेसाठी अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज भरताना दिसत आहे. हे अर्ज भरताना अनेक उमेदवारांना आपल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रता, संपत्ती, यांसह विविध गोष्टी नमूद कराव्या लागतात. यानुसार ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण उमेदवारांपैकी तब्बल 41 टक्के उमेदवार दहावी देखील उत्तीर्ण नसल्याचे प्रतिज्ञापत्रातून […]
ठाणे : सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. गेल्या काही दिवासांपासून लोकसभेसाठी अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज भरताना दिसत आहे. हे अर्ज भरताना अनेक उमेदवारांना आपल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रता, संपत्ती, यांसह विविध गोष्टी नमूद कराव्या लागतात. यानुसार ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण उमेदवारांपैकी तब्बल 41 टक्के उमेदवार दहावी देखील उत्तीर्ण नसल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. तसेच एकूण 66 उमेदवारांपैकी तब्बल 27 उमेदवारांनी दहावीमध्येच आपले शिक्षण सोडल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरेलेल्या 23 उमेदवारांपैकी 11 उमेदवार हे दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे. तर 4 उमेदवारांचे शिक्षण अकरावी किंवा बारावीपर्यंत झाले आहे. तर उरलेले 5 उमेदवार उच्चशिक्षित आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांचे शिक्षण चौथी पास आहे. पण मल्लिकार्जुन पुजारी यांचा विकासाकडे लक्ष असल्याने त्यांना बविआतर्फे कप-बशी या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडून प्रभाकर जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे शिक्षण फक्त 11 वी पर्यंत झाले आहे. ते सध्या एअरकंडिशन या निशाणीवर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडून निवडणूक लढवणार आहेत.
त्याशिवा कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले बहुजन मुक्ती पक्षाचे एकमेव उमेदवार हे अशिक्षित असून ते बेरोजगार आहेत. मात्र विविध पक्षाच्यावतीने उमेदवारांचे शिक्षण न बघता केवळ निवडणुकीत खर्च करण्याची क्षमता बघून उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
एकीकडे सरकारकडून ‘पढेगा इंडिया बढेगा इंडिया’ यांसारख्या योजना राबवल्या जात असताना, निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार मात्र अशिक्षित असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दिल्लीत जायचे असेल, तर अभ्यास आणि शिक्षण महत्त्वाचे नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिक्षणांपेक्षा लोकांची कामे आणि विकासाच्या मुद्याला धरुन उमेदवाराने काम केली पाहिजे असे मत ठाणेकर व्यक्त करत आहेत.
सध्या लोकसभा निवडणूक क्षेत्रात उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांमध्ये उच्च शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यात शिक्षण नसल्याचे अनेक उमेदवार हे अपक्ष आहेत. तर काही उच्चशिक्षित उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तसेच काही ठिकाणी घराणेशाही बघत उमेदवारी दिल्याचे स्पष्ट होत आहे, असे मत राजकीय विश्लेषक सोपण बोगाणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं.