टक्का कुणाला ‘धक्का’ देणार, कुणाची नाव ‘धक्क्या’ला लावणार?, वाचा सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय?
पाच राज्यांच्या पार पडत असलेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या अनुषंगाने आजच्या सामना अग्रलेखामध्ये भाष्य करण्यात आलं आहे. (5 state assembly election 2021 Saamana Editorial Sanjay Raut)
मुंबई : पाच राज्यांच्या पार पडत असलेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या अनुषंगाने (5 state assembly election 2021) आजच्या सामना अग्रलेखामध्ये (Saamana Editorial) भाष्य करण्यात आलं आहे. वाढलेला किंवा कमी झालेल्या मतदानाचा टक्का कोणाला ‘धक्का’ देतो, कुणाची नाव ‘धक्क्या’ला लावतो, असा प्रश्न उपस्थित करत एकूणच पाच राज्यांच्या निवडणूक मतदान टक्क्यांवर आधारित अग्रलेखात भाष्य करण्यात आलंय. (5 state assembly election 2021 Saamana Editorial Sanjay Raut)
‘अंदाजपंचे’ प्रत्यक्ष निकालापर्यंत सुरू…
प . बंगाल वगळता आसाम, तामिळनाडू , केरळ आणि पुद्दुचेरी या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसला आहे. या राज्यांमधील वाढलेल्या आणि घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या रेघोट्या बसलेल्या धुरळ्यावर मारण्याचे उद्योग मतमोजणीपर्यंत सुरु राहतील. आसाममधील विक्रमी 82 टक्के मतदान असो, प . बंगाल, केरळ आणि पुद्दुचेरीमधील 75 टक्क्यांच्या घरातील मतदान असो की तामिळनाडूतील घसरलेले 65.11 टक्के मतदान, हा ‘ टक्का ‘ कोणाला ‘धक्का’ देतो, कोणाची नाव ‘धक्क्या’ला लावतो यावर सर्वांचे ‘अंदाजपंचे’ प्रत्यक्ष निकालापर्यंत सुरू राहील.
बंगालमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तलवारबाजी आता आणखी जोरात सुरू होईल…
देशात सध्या कोरोना आणि तापमानाचा पारा वाढत आहे. त्याचवेळी पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा ‘ज्वर’ही वाढलेला होता. त्यापैकी केरळ, तामीळनाडू, पुद्दुचेरी आणि आसाम या चार राज्यांमधील निवडणुकीचा माहोल मंगळवारी शांत झाला. प. बंगालमधील मतदान एकूण आठ टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यापैकी तीन फेऱ्या झाल्या आहेत आणि पाच बाकी आहेत. त्यात इतर राज्यांतील मतदान संपल्याने प. बंगालमध्ये आधीपासूनच सुरू असलेली आरोप-प्रत्यारोपांची तलवारबाजी आता आणखी जोरात सुरू होईल.
तामिळनाडूत मतदानाची टक्केवारी घसरली..
मंगळवारी जे मतदान झाले त्यात तामिळनाडूतील ‘टक्का’ काहीसा घसरला, तर आसाममध्ये सर्वाधिक म्हणजे 82 टक्के मतदान झाले. प. बंगालमध्ये 30 जागांसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी 77.68 अशी होती. पुद्दुचेरीसारख्या छोट्या राज्यात 78.13 टक्के तर केरळमध्ये 73.58 टक्के मतदान झाले. तामिळनाडूमध्ये मात्र हा आकडा 65.11 टक्के एवढा खाली आला. आता तामिळनाडूत मतदान का घसरले हा नेहमीप्रमाणे राजकीय संशोधनाचा विषय ठरू शकतो. ज्या पाच राज्यांत मंगळवारी मतदान झाले त्या प्रत्येक राज्यात यंदाची विधानसभा निवडणूक कुठल्या तरी कारणाने ‘कांटे की टक्कर’ ठरली आहे.
प. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात वर्चस्वाची लढाई
प. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी तर ही निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. भाजपने सर्व प्रकारची आयुधे वापरून प. बंगालला निवडणुकीचे रणमैदानच बनविले आहे. आसाममध्येही सत्ता टिकवायची असल्याने भाजपने निवडणुकीचे सर्व फंडे वापरण्यात जराही कुचराई केलेली नाही. 90 मतदार असलेल्या एका मतदान केंद्रावर 171 मतदारांनी मतदान केल्याचा ‘विक्रम’ याच प्रयत्नातून झाला का, असा संशयाचा धूर त्यामुळेच निघत आहे. साहजिकच मतदानाचा विक्रमी आकडादेखील चर्चेचा विषय न ठरता तरच नवल होते. नेहमीप्रमाणे हा वाढीव टक्का आमचाच असे दावे आता सत्ताधारी आणि विरोधक दोघेही करतील. प्रत्यक्ष काय होते ते मतमोजणीमध्येच कळेल.
दक्षिणेकडील शेजारील राज्य पण राजकीय संस्कृती आणि प्रवृत्ती वेगवेगळी
शेजारच्या प. बंगालमध्ये आतापर्यंत मतदानाचे तीन टप्पे पार पडले. त्यातील मतदानाचा ट्रेण्ड सारखाच राहिला आहे. पुढील पाच फेऱ्यांमध्ये तो कसा ‘फेर’ धरतो, किती बदलतो, उंचावतो की घसरतो यावर तेथील अंतिम निकाल अवलंबून असेल. दक्षिणेकडील केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू हे परस्परशेजारी असले तरी प्रत्येकाची राजकीय संस्कृती आणि प्रवृत्ती वेगवेगळी आहे. केरळमध्ये कधी डावी आघाडी तर कधी काँग्रेसप्रणित आघाडी सत्तेत राहिली आहे. सध्या तेथील सत्ता डाव्या आघाडीकडे आहे. साहजिकच मंगळवारी झालेले 73.58 टक्के तदान डाव्या आघाडीला की काँग्रेसप्रणीत आघाडीला यावर चर्वितचर्वण होणार हे निश्चित आहे.
तेथील 78 टक्के मतदान बदल घडवणार का?
पुद्दुचेरीमध्ये निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपवाल्यांनी तेथील काँग्रेस सरकार अल्पमतात आणले. तेथे राष्ट्रपती राजवट लादली. त्यामुळे तेथील 78 टक्के एवढे मतदान काही वेगळे घडविणारे ठरते का, हादेखील प्रश्न आहेच. तामीळनाडूमध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचाही ‘पल्स रेट’ मतदानाच्या कमी टक्केवारीने वर-खाली केला आहे. त्या राज्यात प्रामुख्याने अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांच्यातच आलटून पालटून सत्ताबदल होत आला आहे. त्यामुळे खाली आलेले मतदान कोणाला खाली खेचते हे मतमोजणीतच समजेल.
(5 state assembly election 2021 Saamana Editorial Sanjay Raut)
हे ही वाचा :
PHOTO | वाझे-देशमुख ‘सेटलमेंट’च्या पत्रात थेट शरद पवारांचा उल्लेख, वाचा सविस्तर प्रकरण