निवडणूक आयोगाकडून प्रज्ञा ठाकूरांच्या प्रचारावर 72 तासांची बंदी
भोपाळ : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने 72 तासांसाठी म्हणजेच तीन दिवसांसाठी प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रचारावर बंदी घातली आहे. गुरुवारी (2 मे) सकाळी 6 वाजल्यापासून प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रचारावर प्रतिबंध लागू होणार आहे. टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत बाबरी मशिदीबाबत […]
भोपाळ : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने 72 तासांसाठी म्हणजेच तीन दिवसांसाठी प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रचारावर बंदी घातली आहे. गुरुवारी (2 मे) सकाळी 6 वाजल्यापासून प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रचारावर प्रतिबंध लागू होणार आहे.
टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत बाबरी मशिदीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई केली आहे. यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार दाखल केली होती. यामुळे प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रचारावर 72 तासांची बंदी घालण्यात आली आहे.
“मी निवडणूक आयोगाचा सन्मान करते. पण मी शांत राहिले, तर इतर लोक माझ्यावर टीका करतील”, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर दिली.
निवडणूक आयोगाने प्रज्ञा ठाकूर यांच्यावर अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिदवर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर भोपाळचे मुख्य निवडणूक अधिकारी सुदाम खाडे यांनी प्रज्ञा ठाकूर यांना नोटीस पाठवली होती. अयोध्या प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मध्य प्रदेशमधील टीटी नगर पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय म्हणाल्या होत्या प्रज्ञा ठाकूर?
काही दिवसांपूर्वी प्रज्ञा ठाकूर यांनी टीव्ही 9 भारतवर्षला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होते की, “मी बाबरी मशिदीवर फक्त चढले नव्हती, तर ती पाडण्यासाठी मदतही केली होती, यावर मला खूप गर्व आहे, मला देवाने शक्ती दिली आहे, आम्ही देशाचे कलंक मिटवले”, असं वक्तव्य केले होते.
या वक्तव्यामुळे भोपाळ निवडणूक आयोगाने प्रज्ञा ठाकूर यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आणि यावर समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे प्रचारावर 72 तासांची बंदी घालण्यात आली.
संबधित बातम्या :
ड्युटीवर निधन झाल्याने हेमंत करकरे शहीद, त्यांची एटीएस प्रमुख म्हणून भूमिका अयोग्य : सुमित्रा महाजन
‘प्रज्ञा ठाकूरने मसूदला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईकची वेळ आली नसती’
प्रज्ञा ठाकूर दहशतवादी नाही, राष्ट्रवादी महिला आहे : बाबा रामदेव
शहीद करकरेंचा महाराष्ट्रातील सहकारी साध्वी प्रज्ञाविरोधात निवडणूक लढवणार