हे काय? आमदार विजयी जल्लोषात अन् चोरट्यानं 75 हजार मारले, कोकणात काय घडलं?
नवी मुंबई येथे सुरु असलेल्या विजयी जल्लोषादरम्यान हा प्रकार घडल्याचा संशय ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
निनाद करमरकर, कल्याणः विधान परिषद निवडणुकीचा (MLC Election) धुरळा काल उडाला. राज्यातील पाच जागांचे निकाल लागले. विजयी उमेदवारांच्या (winner) कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. कोकणातदेखील भाजप (BJP) आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत चोरट्यांचाही समावेश होता. या चोरट्यांनी खुद्द विजयी आमदारालाही सोडलं नसल्याचं समोर आलं आहे. कालच्या विजयी मिरवणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या खिशातून पैसे चोरीला गेल्याचं समोर आलं आहे.
75 हजार चोरले…
ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जल्लोष केला. यावेळी म्हात्रे यांना आलिंगन देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं असता त्यांच्या समोरच्या खिशात असलेले 50 हजार रुपये आणि मागच्या खिशात असलेले 25 हजार रुपये असे एकूण 75 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरले.
हा प्रकार म्हात्रे यांच्या लागलीच लक्षात आला, मात्र चोरटा गर्दीत मिसळल्याने म्हात्रे यांना चोरट्याला ओळखता आलं नाही. या प्रकारानंतर म्हात्रे यांनी मतमोजणी केंद्रावरील पोलिसांना याबाबत तोंडी तक्रार केली.
मात्र पोलिसांनाही हा चोरटा सापडू शकला नाही. म्हात्रे यांनी आज याबाबत माहिती दिली. सोबतच अशा गर्दीच्या ठिकाणी आणि जल्लोषात सहभागी होताना यापुढे सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं.
नवी मुंबई येथे सुरु असलेल्या विजयी जल्लोषादरम्यान हा प्रकार घडल्याचा संशय ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. कोकण शिक्षक मतदार संघात म्हात्रे यांचा विजय झाल्यानंतर बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी विजयी रॅली काढली. नवी मुंबईत सदर प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रेंचा दणदणीत विजय
कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला. म्हात्रे यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव केला. कोकणातील या निवडणुकीत 35 हजार 700 मतं वैध ठरली. त्यापैकी 20 हजार 648 मतं मिळवून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय संपादन केला. तर बाळाराम पाटील यांना फक्त 9 हजार 500 मतांवर समाधान मानावं लागलं.
ज्ञानेश्वर म्हात्रे हे मूळचे बदलापूर येथील रहिवासी आहेत. 2017 मधील कोकण शिक्षक मतदार संघातून त्यांना बाळाराम पाटील यांच्याविरोधात पराभव पत्करावा लागला होता.