78 वर्षीय पवारांच्या 80 सभा, मतदान करुन दुष्काळ दौऱ्यावर रवाना
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर या वयात त्यांना एवढी धावपळ होणार नाही, अशी टीका करण्यात आली. पण या लोकसभा निवडणुकीत पवारांनी तरुण नेत्यांनाही लाजवणारा प्रचार केला. 78 वर्षीय शरद पवारांनी राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये 80 पेक्षा जास्त सभा घेतल्या. ज्या जागा जिंकण्याचा विश्वास आहे तिथे जास्त जोर लावत त्यांनी दोन […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर या वयात त्यांना एवढी धावपळ होणार नाही, अशी टीका करण्यात आली. पण या लोकसभा निवडणुकीत पवारांनी तरुण नेत्यांनाही लाजवणारा प्रचार केला. 78 वर्षीय शरद पवारांनी राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये 80 पेक्षा जास्त सभा घेतल्या. ज्या जागा जिंकण्याचा विश्वास आहे तिथे जास्त जोर लावत त्यांनी दोन पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांशीही संवाद साधला. महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतरही त्यांनी आराम केला नाही. मतदान करुन ते दुष्काळी दौऱ्यासाठी रवाना झाले.
तरुणांनाही लाजवणारा पवारांचा प्रचार
राज्यातील रखरखत्या उन्हात शरद पवारांनी स्वतःची संपूर्ण ताकद पणाला लावली. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माढा, सातारा, कोल्हापूर आणि बारामती या चारच जागा निवडून आल्या होत्या. पण त्यांनी यावेळी योग्य ते नियोजन आखत जिंकण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त सभा घेण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी आपल्या मतदारसंघात येणं हे देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देणारं असतं. त्यामुळेच त्यांनी बीड, शिरुर, मावळ, अहमदनगर अशा जवळपास 15 मतदारसंघांमध्ये जास्त लक्ष ठेवलं.
बारामतीमध्ये भाजपने शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भाजपला काही प्रमाणात यशही आलं. दौंड मतदारसंघामध्ये 2014 ला राष्ट्रवादीला पिछाडीवर जावं लागलं होतं. त्यामुळे यावेळी दौंडमध्ये पवारांनी एकाच दिवसी तीन-तीन सभा घेत मैदान गाजवलं. शिवाय स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत कामाला लावलं. दुसरीकडे मावळ मतदारसंघात नातू पार्थ पवार उभा असल्यामुळे तिथेही पवारांनी स्वतः लक्ष घातलं. चिंचवड, मावळ या भागात राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी तळ ठोकला होता. तर रायगड जिल्ह्यातील ज्या भागात शेकापवर राष्ट्रवादीची मदार आहे, तिथे पवारांनी स्वतः लक्ष घातलं.
पवारांची हिप सर्जरी झालेली आहे. पण तब्येतीची काळजी घेतानाच त्यांनी उमेदवारांकडेही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचाही प्रचार केला. नगर जिल्ह्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद बाजूला ठेवत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरुच ठेवला. पवारांनी राज्यात ज्या सभा घेतल्या, त्यासाठी त्यांनी बहुतांश सभांसाठी रस्त्याने प्रवास केला.
मतदान करुन दुष्काळ दौऱ्यावर रवाना
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दुष्काळ हा मुद्दा मागे पडला. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये आजही पिण्यासाठी पाणी नाही. प्रचारामध्ये पवारांना लोकांनी याची दाहकता सांगितली. त्यामुळे मतदान झाल्यानंतर दुष्काळी पाहणी करण्याचं आश्वासन पवारांनी दिलं होतं. मतदान करताच शरद पवार उस्मानाबाद आणि सोलापूरच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.