‘संयमाचा खेळ’, उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांची राष्ट्रवादी करणार शिकार ?
महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांमध्ये एकमेकांचा पक्ष फोडायचा नाही असा अलिखित करार झाला होता. मात्र, खेडमध्ये जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.
मुंबई : लोकसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष उरले आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांमध्ये सुरू झाली आहे. त्यात सध्या तरी भाजपने आघाडी घेतली आहे. योजना आणि ग्राउंड वर्कबाबत भाजप अन्य पक्षापेक्षा दहा पावले पुढेच आहे. एके काळी भाजपसोबत असणारे उद्धव ठाकरे यांना भाजपच्या आगामी रणनीतीचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपचे काटेकोर नियोजन लक्षात घेऊन उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीनेही आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या पक्ष नाही आणि निवडणूक चिन्हही नाही. तरीही महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचाच शब्द प्रमाण मानला जात आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट या दोन पक्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा जागा वाटपावरून प्राथमिक चर्चेची फेरी पूर्ण झाली आहे. तर, काँगेसकडून चर्चेसाठी तत्परता दाखविली गेली नाही. पण, जागावाटपामध्ये काँग्रेसलाही विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. असे असले तरी जागावाटपावेळी राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे गटाची शिकार केली जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांमध्ये एकमेकांचा पक्ष फोडायचा नाही असा अलिखित करार झाला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या खेडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. संजय कदम यांचा २०१९ च्या निवडणुकीत रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांनी पराभव केला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात ज्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला सुरुंग लावला. त्या ४० आमदारांच्या मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याची तयारी उद्धव ठाकरे करत आहेत. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीचे संजय कदम यांना आपल्या पक्षात आणले. संजय कदम हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे होते.
सध्या मौन बाळगले
2024 मध्ये त्यांना उमेदवारी देण्याची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. त्यामुळेच कदम यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश ही बाब राष्ट्रवादीच्या नेत्यांना पटलेली नाही आणि पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा झाली. 2020 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पारनेर नगरपरिषदेतील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार यांच्याकडे ठाकरे यांनी तक्रार केल्यामुळे त्या नगरसेवकांना शिवसेनेत परत यावे लागले होते. त्यानंतर याची आठवणही या नेत्याने करून दिली.
सध्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून हल्लाबोल सुरू आहे. अशा वेळी महाविकास आघाडीमधील सहयोगी पक्ष उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उभे राहू इच्छित नाहीत. त्यामुळेच आम्ही सध्या मौन बाळगले आहे. पण, योग्यवेळी ही नाराजी उद्धव यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल, असेही ते म्हणाले.
संभाव्य विजयी मित्र
राष्ट्रवादीच्या या मौनामागे आणखी एक कारण आहे. महाराष्ट्रात उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दलची प्रचंड सहानुभूती आहे. भाजपच्या जाळ्यात अडकल्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार नाहीत. लोकसभेची मुदत संपायला एक वर्ष तर विधानसभेला सुमारे दीड वर्ष आहे. अशावेळी आहे ती महाविकास आघाडी टिकवून उद्धव यांच्या लोकप्रियतेच्या बळावर भाजपाला रोखू शकतो याची खात्री आहे. त्यामुळे आम्हाला संभाव्य विजयी मित्र गमावायचा नाही. मोठ्या हितासाठी छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया न देता काय घडते आहे ते पाहणे चांगले, असे या नेत्याने स्पष्ट केले.
जागावाटपाच्या चर्चेत मोठा वाटा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चिंचवड निवडणुकीतील पराभवानंतर एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगले परिणाम मिळवायचे असतील तर एकत्र बसून जागा वाटपाच्या सूत्रावर चर्चा करावी लागेल. याचाच अर्थ राष्ट्रवादीला जागावाटपाच्या चर्चेत मोठा वाटा मिळवायचा आहे. या वाटाघाटी सर्वात महत्त्वाच्या असतील. तोपर्यंत राष्ट्रवादीचे नेतृत्व सर्व घडामोडींवर अत्यंत संयम दाखवेल, असे त्यांनी सांगितले.