मुंबई : राज्यातील एक मंत्री महिला नेत्याला भिकार.. असे म्हणतो, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. राज्यातील राजकारणाचा दर्जा खालावल्याचा आरोप त्यांनी केला. तर हे वक्तव्य करणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना, तू कोण?, आपली लायकी काय? आपण बोलतोय काय? असे फटकारले. यानिमित्ताने राज्यातील राजकारणाच्या स्थितीवरही ठाकरे यांनी सर्वच पक्षांना खडे बोल सुनावले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गट अध्यक्षांचा मेळावा आज मुंबईतील नेस्को मैदानात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणाचा स्तर खालावल्याबद्दल राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.
आपण आधीपासूनच हिंदुत्ववादी असल्याचा टोला त्यांनी सत्तार यांना लगावला. त्यानंतर त्यांनी सत्तार यांच्यावर सडकून टीका केली. महिला नेत्यांना टीव्हीवर शिव्या देता हीच आपली संस्कृती आहे का? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीने रान पेटवलं होते. त्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान सत्तार यांची जीभ घसरली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिप्पणी करताना सत्तार यांचा तोल गेला होता.
सत्तार यांच्या टिप्पणीनंतर राज्यभर सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. उद्धव ठाकरे यांनी आणि काँग्रेसने ही सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत समाचार घेतला होता. तसेच सत्तार यांच्या राजीनाम्याची जोरकस मागणी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचे कान टोचल्याची चर्चा होती. त्यानंतर सत्तार यांनी अनेक कार्यक्रमात, बैठकीत जाहीर वक्तव्य करण्याचे टाळले होते. आज राज ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
राज्यात जातीवाद वाढत असल्याबद्दल, राजकारणाचा चिखल होत असल्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या भाषणात संताप व्यक्त केला. आपण आपल्या पुढच्या पिढीला कोणता आदर्श देणार आहोत? असा सवाल ही त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना विचारला.