अहमदनगरचं नामांतर की विभाजन ?; या वादाला मिळाली आता राजकीय फोडणी…
नगर हा जिल्हा एक आहे मात्र त्याच्या नामांतरासाठी दोन नावांचा आग्रह आहे. आणि काहींच्या मते जर नगरचं विभाजन झालं तर ते ३ भागात व्हायला हवं असं मत व्यक्त केले जात आहे.
अहमदनगरः नगर हा जिल्हा एक आहे मात्र त्याच्या नामांतरासाठी दोन नावांचा आग्रह आहे. आणि काहींच्या मते जर नगरचं विभाजन झालं तर ते 3 भागात व्हायला हवं असं मत व्यक्त केले जात आहे. जिल्हा एक, नामांतरासाठी नावं दोनं, आणि विभाजनाच्या चर्चा आहेत तीन. महाराष्ट्रात श्रेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा आणि वेगवेगळ्या 4 प्रांताना जोडणाऱ्या सीमा आणि देशातल्या 6 मोठ्या राज्यांहून मोठा भाग म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे. अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्याचं नामांतर आणि विभाजनाचा वाद सुरु आहे. या दोन्ही मुद्द्यांना परत एकदा राजकीय फोडणी मिळाली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी नगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली आहे. तर विभाजनाऐवजी नामांतर व्हावं, असं खासदार सुजय विखे यांचं म्हणणं आहे.
नामांतराच्या वादातही दावे-प्रतिदावे आहेत, बाळासाहेब ठाकरे यांनीच नगरचं नाव बदलून अंबिकानगर व्हावं, अशी मागणी 1995 मध्ये केली होती. त्यानंतर 2 वर्षांपूर्वी नगरचं अहिल्याबाईनगर करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
वास्तविक नगरच्या विभाजनाची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र तत्कालीन काँग्रेसचे दोन्ही बडे नेते अर्थात राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्या मतभेदांमुळे तो मुद्दा मागे पडल्याचं बोललं जातं आहे.
संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला आहे तर त्यामुळे नगरचं विभाजन झालंच तर नवा जिल्हा संगमनेर व्हावा. यासाठी आग्रह होता.
विखे समर्थक गट नगरच्या विभाजनातून शिर्डी हा नवा जिल्हा व्हावा, या मताचा होता आणि नगरमधले इतर नेते मोठी बाजारपेठ म्हणून विभाजनातून श्रीरामपूर किंवा मग कोपरगावला जिल्हा बनवण्याच्या विचारांचे असल्याचे बोलले जात आहे.
विभाजन झालं तर कोणता जिल्हा तयार व्हावा यासाठी 3 नावं आहेत. आणि नामांतर झालं तर काय व्हावं, यासाठ दोन नावांचा आग्रह धरण्यात आला आहे.
1486 मध्ये मलिक अहमद हा दख्खन भागातल्या निजामशाहीच्या पंतप्रधान बनला 9 वर्षानंतर त्यानं सीना नदीच्या काठावर एक शहर वसवलं त्याच शहराला पुढे अहमद नावं दिलं गेल्यामुळे ते आजचं अहमदनगर बनलं.
1995 दरम्यान नगरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती. केडगावात अंबिकेचं मंदिर असल्यामुळे अहमदनगरचं नाव अंबिकानगर करावं, अशी मागणी पहिल्यांदा शिवसेनेनं केली. अंबिकानगरच्या नावाला शिवसेनेसह मनसेचाही पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
आता नगरला पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं नाव देण्याची मागणी का होते तर महान शिवभक्त, उत्तम शासक, शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई साऱ्या देशाला ठाऊक आहेत.
त्याच अहिल्याबाईंचा जन्म नगर जिल्ह्यातल्या चौंडी गावात झाला आहे. म्हणून नगरला अहिल्यानगर नाव देण्याचीमागणी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.