मतदानाचा टक्का का घसरला? पोलिंग बुथवर फिरुन आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा
महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी यामागे निवडणूक आयोगाकडून पोलिंग बुथवर योग्य सोयीसुविधा न पुरवण्यात आल्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरल्याचा दावा केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक बूथवर जावून पाहणी करत आहेत. या पाहणीत त्यांना काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाकडून योग्य नियोजन न झाल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पोलिंग बूथवर सुविधा नसल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाला, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “हा व्हिडीओ निवडणूक आयोगासाठी आहे. मुंबईत आज मतदान आहे आणि सगळे मुंबईकर सकाळपासून मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. पण प्रश्न हा आहे की मुंबईतील पोलिंग बूथवर सोयीसुविधा फार कमी आहेत. सगळे उन्हात उभे आहेत. पंखेसुद्धा लावण्यात आले नाहीत. एक दोघांना चक्कर सुद्धा आली. पाण्याची सोय नाही. सावलीत कुठे रांगा उभ्या केल्या नाहीत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“तसे पहिले तर याची पूर्ण आणि पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आम्ही त्यात काही करू शकत नाहीत. प्रयत्न जरी केला तरी आमच्यावर केस होईल. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही सगळे मुंबईकर रस्त्यावर उतरल्यानंतर आम्ही जे काही गेल्या काही दिवसांपासून पाहात होतो. इलेक्शन कमिशनकडून फोन आणि मेसेज येत होते. सेलिब्रिटींना घेऊन व्हिडीओ येत होते की मतदानाला उतारा आणि व्होट करा. पण आम्ही मतदान करत असताना मतदानाचा टक्का कमी होतोय. त्याला काही कारणं आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
‘मतदान नीट होण्यासाठी मतदारांची मदत करा’
“काही ठिकाणी लोक रांगेत उभे आहेत. काही ठिकाणी घड्याळ घालायचे की नाही घालायचे, फोन आत न्यायचा की नाही न्यायचा, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे”, यामुळे मतदानाचा टक्का घसरत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “मतदान नीट होण्यासाठी मतदारांची मदत करावी. रांगेत उभे असलेल्या मतदारानं मदत करा”, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
‘आम्हाला नको तर लोकांना विचारा’
“आपण पाहिलं असेल की मुंबईकर मतदानासाठी उतरत नाहीत. पण आज मुंबईकर मतदानाला उतरले आहेत. निवडणूक आयोगाकडून स्लो होत आहे. आपण बूथवर जाऊन आढावा घ्या. काही ठिकाणी मुद्दाम हे केलं जात आहे. मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आज आम्हाला नको तर लोकांना विचारा. कारण आज लोकांचा दिवस आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.