Aaditya Thackeray : गद्दारांची लायकी नाही, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही; आदित्य ठाकरेंनी सुहास कांदेंना फटकारले
Aaditya Thackeray : गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांची लायकी नाही. गद्दारांना प्रश्न विचारण्याची हिंमत नसावी. शिवसैनिकांनी प्रश्न विचारला असता तर उत्तर दिलं असतं. मी शिवसैनिकांच्या प्रश्नाला बांधिल आहे. पण गद्दारांना उत्तर द्यावं याला मी बांधिल नाही.
नाशिक : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आम्हाला निधी दिला नाही. त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. त्यांनी उत्तरे दिली तर मी तात्काळ आमदारकीचा राजीनामा देईन, असं आव्हानच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी दिलं होतं. तसेच आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना भेटून जाब विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ही कांदे यांच्यावर पलटवार केला आहे. मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे. आदित्य ठाकरे नाशिकमध्ये (nashik) आहेत. सकाळी नाशिकच्या काळाराम मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ते मनमाड येथे आले. मनमाड येथे शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी सुहास कांदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांची लायकी नाही. गद्दारांना प्रश्न विचारण्याची हिंमत नसावी. शिवसैनिकांनी प्रश्न विचारला असता तर उत्तर दिलं असतं. मी शिवसैनिकांच्या प्रश्नाला बांधिल आहे. पण गद्दारांना उत्तर द्यावं याला मी बांधिल नाही. गद्दारी का केली? ही लोकांची भावना आहे. गद्दारांनी ती पाहावी, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
निधी दिल्याची यादीच काढली
आपल्या मतदारसंघात निधी दिला नसल्याचा सुहास कांदे यांचा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी खोडून काढला. मनमाडला 8 कोटीचा फंड दिला आहे. मंदिर आणि रस्त्यासाठी फंड दिला. गुरुद्वारासाठी फंड दिला, असं सांगत आदित्य ठाकरेंनी कुठे किती फंड दिला याची माहिती देणारा कागद काढून यादीच वाचून दाखवली. ही यादी लोकांमध्ये जाऊ द्या. पण मी गद्दारांना उत्तर देणार नाही. पण लोकांना ही यादी कळू द्या, असंही ते म्हणाले.
तात्पुरतं सरकार आहे
गद्दारांनी माणूसकी सोडून राजकारण केलं आहे. मुलगा आणि शिवसैनिक म्हणून मला कधीच हे राजकारण पटलेलं नाही. या गद्दारांना पाठिंबा देणार की शिवसेनेच्या पाठी उभं राहणार आहात हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. हे लोक आता प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गोष्टी काढत आहेत. आज त्यांना हिंदुत्व आठवलं आहे. आज त्यांना निधी आठवत आहे. मला यांच्या बद्दल राग आणि द्वेष नाही. पण एक सांगतो. हे बेकायदेशीर सरकार आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे तात्पुरतं सरकार आहे. बेकायदेशीर आहे. गद्दारांचं सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.