ठाकरे विरुद्ध राणे… दोन तासात राजकोट किल्ल्यावर काय काय घडलं?
तब्बल 2 तासांनी आदित्य ठाकरे आणि महाविकासआघाडीचे नेते राजकोट किल्ल्याबाहेर पडले. यावेळी राणेंच्या समर्थकाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Aaditya Thackeray Vs Narayan Rane : सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर महाविकासाआघाडीच्या नेत्यांकडून आज पहाणी दौरा करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर उपस्थित होते. याच दरम्यान खासदार नारायण राणे, नितेश राणे हे महायुतीच्या कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. त्यानंतर मोठा राडा पाहायला मिळाला.
दोन तासात राजकोट किल्ल्यावर काय काय घडलं?
- राजकोट किल्ल्यावर महाविकासाआघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
- यावेळी सुरुवातीला निलेश राणे हे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी पोहोचले.
- निलेश राणेंपाठोपाठ नारायण राणेही पाहणीसाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले.
- नारायण राणेंकडून पाहणी सुरु असतानाच आदित्य ठाकरेही राजकोट किल्ल्यावर दाखल झाले.
- आदित्य ठाकरेंसोबत जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, रावसाहेब दानवे, विनायक राऊतही किल्ल्यावर पोहोचले.
- दोन्हीही नेत्यांची पाहणी सुरु असतानाच भाजप आणि मविआचे कार्यक्रर्ते आक्रमक झाले.
- यावेळी पोलिसांकडून दोन्हीही कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
- यावेळी नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली.
- हा भाजपचा बालिशपणा आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना या किल्ल्यात कोणतीही घटना घडता कामा नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
- यानंतर नारायण राणेंनी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागच्या दाराने किल्ल्याबाहेर जावं, असे सांगितले. त्यावर आदित्य ठाकरेंनी मी मुख्य प्रवेशद्वारातूनच बाहेर जाणार, असे सांगत ठिय्या आंदोलन केले.
- यानंतर जयंत पाटील यांनी नारायण राणे आणि निलेश राणेंशी संवाद साधत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
- त्यानंतर नारायण राणे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरुन १० फूट जागा मोकळी करुन द्यावी, असे सांगितले. त्यानुसार ही १० फूट जागा मोकळी करण्यात आली.
- यानतंर पोलिसांनी आदित्य ठाकरेंची संवाद साधत १० फूट जागा मोकळी केल्याचे सांगितले. यानतंर तब्बल 2 तासांनी आदित्य ठाकरे आणि महाविकासआघाडीचे नेते राजकोट किल्ल्याबाहेर पडले. यावेळी राणेंच्या समर्थकाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे.