Video : ठाकरे गटाला पुन्हा खिंडार; आदित्य ठाकरे यांच्या सर्वात जवळच्या नेत्याचा उद्या शिंदे गटात प्रवेश
2019 ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन झाले होते. एकनाथ शिंदे यांनी 50 योद्धे सोबत घेऊन बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला. मागील अडीच वर्षात सर्व कामे करून त्यांनी गतिमान सरकार स्थापन केलंय.
महेश सावंत, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : आमदार मनिषा कायंदे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. ते उद्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. कनाल यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे मुंबईतच ठाकरे गटामध्ये पडझड सुरू झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राहुल कनाल हे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आहेत. राहुल कनाल आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री सर्वश्रृत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये पटेनासे झाले आहे. आमच्या मैत्रीत कोणी तरी भांडणं लावून देत असल्याची प्रतिक्रिया कनाल यांनी व्यक्त केली होती. कनाल हे युवा सेनेचं काम पाहायचे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी आता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
पदांना स्थगिती
कनाल हे वांद्रे पश्चिम मतदारसंघात राहतात. कनाल हे पक्षातून जाणार असल्याने वांद्रे पश्चिम येथील युवा सेनेच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे गटाने ही स्थगिती दिली आहे. कनाल यांच्यासोबत युवा सेनेतून कोण कोण शिंदे गटात जाणार हे पाहिल्यानंतरच युवा सेनेच्या पदांबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, युवती सेनेची कार्यकारिणी आहे तशीच ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राणेंनी बातमी फोडली
राहुल कनाल हे शिंदे गटात जाणार असल्याची बातमी आमदार नितेश राणे यांनी दिलीय. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय राहुल कनाल उद्या शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हा ठाकरे गटाला धक्का आहेच, पण आदित्य ठाकरे यांनाही वैयक्तिक धक्का असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
कायमचे रिटायर होणार
उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात संजय राऊत जसे शकुनी आहेत. तसेच वरूण सरदेसाईही आदित्य ठाकरेंच्या आयुष्यात शकुनी आहे. वरूण सरदेसाईंमुळे आदित्य ठाकरे जवळ कोणी उरले नाही, असा दावा नितेश राणे यांनी केला. तसेच कोव्हिड घोटाळ्यात वरूण सरदेसाईचं नाव येऊ शकतं. त्या घोटाळ्यात वरूण सरदेसाई आघाडीवर होते.
सरदेसाईंला आवरलं नाही तर उद्धव ठाकरेंची जशी अवस्था झाली तशी अवस्था आदित्य ठाकरेंची होईल. लवकरच वरूण सरदेसाई भाजप किंवा शिवसेनेत जाईल. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कायमचे रिटायर करण्याचे काम संजय राऊत आणि वरुण सरदेसाई करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.