जो स्व:त गाडला गेला आहे तो मला काय गाडणार?, खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अब्दुल सत्तार यांचा हल्लाबोल
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा पप्पू असा उल्लेख केल्यानं ठाकरे गटाकडून संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे सत्तार हे देखील ठाकरे गटांच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.
हिंगोली : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा पप्पू असा उल्लेख केल्यानं ठाकरे गटाकडून संताप व्यक्त होत आहे. अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, अब्दुल सत्तार हिरवा साप आता सरडा झाला असा घणाघात ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला होता. आता चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर देताना हल्लाबोल केला आहे. जो स्वत: गाडला गेला आहे तो मला काय गाडणार? चंद्रकांत खैरे लंगडा माणून आहे, खासदार नाही आमदार नाही त्यांच्याकडे काय आहे. त्यांना गाडण्याचं काम मीच केलं आहे, आणि पुढेही गाडणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.
सत्तार यांनी नेमकं काय म्हटलं?
सत्तार यांनी खैरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खैरे लंगडा माणूस आहे. खासदार नाही, आमदार नाही, त्यांच्याकडे काय आहे. त्यांना गाडण्याचं काम मीच केलं आहे आणि यापुढेही गाडणार असं सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार हा हिरवा साप होता आता सरडा झाला अशी टीका खैरे यांनी केली होती. खैरे यांच्या या टीकेला देखील सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खैरे हा झिरो माणूस आहे. त्याची काय चर्चा करायची. त्यांना मी लोकसभा निवडणुकीलाच दाखवून दिलं हिरवा आहे की काळा. ते साध नगरपालिकेला जरी उभे राहिले तरी निवडून येऊ शकणार नाहीत. अशा व्यक्तीच्या टीकेला उत्तर देण योग्य होणार नाही असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंनाही डिवचलं
दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचलं. आदित्य ठाकरे हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून मी राजकारण करत आहे. माझं वय आता 62 वर्ष असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.