अब्दुल सत्तार म्हणतात मी सुरक्षित!! राजीनामा आंदोलनाची धार कमी? की मुख्यमंत्र्यांवर दबाव? 5 वा मुद्दा महत्त्वाचा!
4 कारणांमुळे आधीच शिंदे-फडणवीस यांच्या बॅडबुकमध्ये गेले आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना यापुढे स्वतःवर आवर घालावा लागणार हे नक्की.
औरंगाबादः अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा राजीनामा घेण्याची राष्ट्रवादीची मागणी हळू हळू थंडावतेय की काय असं चित्र आहे. सत्तार यांचं आज औरंगाबादेत (Aurangabad) झालेलं शक्तिप्रदर्शन आणि एक वक्तव्य यात भर पाडणारं ठरतंय. तुमच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय, यावर काय बोलाल, असं विचारल्यावर अब्दुल सत्तार म्हणालेत, मी सुरक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचं टाळलंय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. मात्र दोन दिवसांपासून या आंदोलनाची धारही कमी होतेय. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या जिभेला यापुढे आवर घालण्यासाठी अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे केली होती.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीवस यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र सत्तार यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून ही कारवाई होणारच नाही की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी जरा घातक ठरू शकतं. याची 4 कारणं आहेत. तर सत्तार यांच्यासाठीही सुधारण्याची ही शेवटची संधी असावी, हे सांगणाराही एक मुद्दा आहे-
- शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदेंच्या पाठिशी हे आमदार उभे आहेत. एका आमदारावर कारवाई केली तर इतर आमदारही नाराज होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना हे परवडणारे नाही.
- अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद गेलं तर शिंदे गटाविरोधात ते जनमत दुषित करण्याची शक्यता आहे. आधीच खोके घेण्याच्या आरोपांनी हैराण असलेल्या एकनाथ शिंदे सरकारला हे नुकसान सोसणार नाही.
- मंत्रिमंडळात स्थान मिळण्यावरून शिंदेंचे समर्थक बच्चू कडू, संजय शिरसाट हे आधीच नाराज आहेत. त्यातच अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद काढून घेतलं तर सत्तार आणखी एकाची नाराजी ओढवेल. हे तिन्ही नाराज एकत्र झाले तर शिंदेंना ते झेपावणारं नाही.
- मराठवाडा आणि विशेषतः औरंगाबादेत शिंदे गटाची ताकद टिकवून ठेवायची असेल तर सत्तार हे प्रभावी नेते आहेत. सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे उभे ठाकले तरी निवडून मीच येणार, असा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. आधीच मंत्रीपद न दिल्याने शिरसाट नाराज आहेत. त्यात सत्तारांवर कारवाई झाली तर औरंगाबादच्या शिंदे गटाला तडा जाऊ शकतो.
- सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो सत्तार यांनाही वॉर्निंग देणारा आहे. मंत्रिपद मिळाल्यापासून तुफ्फान भाषणबाजी करणाऱ्या मंत्र्यांना कुठेतरी आवर घालावाच लागणार, असा इशारा देणार आहे. विशेषतः सत्तार यांच्यासाठी ही शेवटची संधी असावी, असं म्हटलं जातंय. आधीच टीईटी घोटाळ्यात नाव येऊनही मंत्रिपद दिलं, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ केली. त्यानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही घोषणा अधिकृत होण्याआधीच सत्तार यांनी त्यांची परस्पर घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच त्यांना झापल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यांनंतर आता तर सुप्रिया सुळेंना अशा प्रकारे शिवीगाळ केली. या 4 कारणांमुळे आधीच शिंदे-फडणवीस यांच्या बॅडबुकमध्ये गेले आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना यापुढे स्वतःवर आवर घालावा लागणार हे नक्की.