मनसेचा युतीचा प्रस्ताव?, एकत्र प्रवास, चर्चा, त्यानंतर राऊत थेट मातोश्रीवर, तर पानसे शिवतीर्थावर; मोठ्या राजकीय घडामोडींना वेग
एखाद्या मिटिंगमधून किंवा चर्चेतून काहीच होत नाही. राज ठाकरे बोलतील. आता युतीचा कोणताही प्रस्ताव नाही. मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी राऊतांकडे गेलो होतो. युती नाही. युतीचा प्रस्ताव नाही, असं अभिजीत पानसे म्हणाले.
मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. राज्यातील या बदलत्या राजकीय समीकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी चर्चा सुरू झाली आहे. हे दोन्ही नेते एकत्र यावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा असून कार्यकर्त्यांनी मुंबई-ठाण्यात बॅनर्सही लावले आहेत. ही चर्चा सुरू असतानाच मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अभिजीत पानसे यांनी थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांच्याशी दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन 15 मिनिटे चर्चा केली. यावेळी पानसे यांनी संजय राऊत यांच्याकडे युतीचा प्रस्ताव दिल्याचं समजतं. या भेटीनंतर संजय राऊत हे सामना कार्यालयातून थेट मातोश्रीवर गेले. तर दुसरीकडे अभिजीत पानसे ठाण्याला घरी न जाता शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीला गेले. दोन्ही नेत्यांनी आधी भेट घेऊन नंतर आपल्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे यांची भेट
अभिजीत पानसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी राज ठाकरे यांच्याशी दहा मिनिटे चर्चा केली. या भेटीत राऊत यांची भूमिका स्पष्ट केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अभिजीत पानसे यांनी युतीच्या प्रस्तावाच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. संजय राऊत हे मातोश्रीतच आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी ते चर्चा करत आहेत. त्यामुळे या राजकीय घडामोडीने राज्यातील राजकारणात नवीन समीकरणे उदयाला येतील असं चित्रं आहे.
प्रवास, चर्चा, प्रवास
अभिजीत पानसे हे भांडूप येथे संजय राऊत यांना भेटले. या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीत बसून भांडूप ते प्रभादेवी असा प्रवास केला. प्रभादेवीपर्यंत येईपर्यंत या 45 मिनिटाच्या काळात या दोन्ही नेत्यात अनेक विषयावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. याचवेळी पानसे यांनी राऊत यांच्याकडे युतीचा प्रस्ताव दिला असून राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केल्याचंही सांगितलं जात आहे. त्यानंतर हे दोन्ही नेते सामना कार्यालयात गेले. दोघांनी सामनात बंद दाराआड 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर राऊत हे तडक मातोश्रीला गेले. तर पानसे शिवतीर्थावर गेले.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास
दोन्ही नेते एकत्र येतील की नाही याबाबत मला माहीत नाही. मला तुमच्याकडून माहिती मिळतेय. दोन्ही नेते एकत्र येण्याबाबतचे बोर्ड लागतात. पण लोकांचा राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास बसला आहे. सध्याचा घोडेबाजार लोक पाहत आहेत. दोन दिवसांपूर्वी हजारो कोटींचा आरोप करणारे नंतर एकत्र येतात. पक्केवैरी आता भाऊ भाऊ म्हणून एकत्र आले आहेत, असं अभिजीत पानसे म्हणाले.
संजय राऊत यांच्याकडे माझं वैयक्तिक काम होतं. दादरला प्रभादेवीला आलो होतो. त्यामुळे शिवतिर्थावर आलो. राज साहेबांसोबत माझी भेट ठरलेली होती, असं सांगतानाच मनसे कुणासोबत जाणार नाही हे राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. याबाबतचं भाष्य राज ठाकरे करतील किंवा उद्धव ठाकरे. मी भाष्य करू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.