मुख्यमंत्र्यांच्या मते, काँग्रेस देशद्रोही?
मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. यावेळी सत्ताधारी विरोधकांसाठी ‘देशद्रोही’ हा शब्द सर्रास वापरत आहेत. तसेच, सभेनंतर किंवा भाषणानंतर विरोधकही सत्ताधाऱ्यांना देशद्रोही या नावाने ट्रोल करत आहेत. पण ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘एन्काऊन्टर’ या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: काँग्रेससह विरोधकांना अप्रत्यक्षपणे देशद्रोही ठरवलं […]
मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. यावेळी सत्ताधारी विरोधकांसाठी ‘देशद्रोही’ हा शब्द सर्रास वापरत आहेत. तसेच, सभेनंतर किंवा भाषणानंतर विरोधकही सत्ताधाऱ्यांना देशद्रोही या नावाने ट्रोल करत आहेत. पण ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘एन्काऊन्टर’ या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: काँग्रेससह विरोधकांना अप्रत्यक्षपणे देशद्रोही ठरवलं आहे.
‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘एनकाऊन्टर’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना “काँग्रेसला तुम्ही देशद्रोही मानता का?” असा प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. “अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने काश्मीर खोऱ्यातून सैन्य कमी करु, सैन्याला दिलेले विशेष अधिकार काढून टाकू असं सांगितलं होतं. तसेच, कलम 124 A हे देखील रद्द करु असेही या जाहीरनाम्यात काँग्रेसने स्पष्ट केलं होतं. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या जाहीरनाम्यात पाकिस्तानशी चर्चा करा असा उल्लेख केला होता.”
“जर उद्या एखाद्या व्यक्तीने म्हटले की, मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं संविधान मान्य नाही, ते मी जाळून टाकेन किंवा एखाद्याने म्हटलं की, मी भारताचा तिरंगा झेंडा मानत नाही. तर त्यांच्यावर 124 A अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. तसेच माओवादी, नक्षलवादी, दहशतवादी यांच्यावरही 124 A अंतर्गत गुन्हा दाखल होतो. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यांच्यावरही 124 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण, काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात 124 A कलम रद्द करु असा उल्लेख केला आहे. त्यामुळे राष्ट्रविरोधी तत्त्वांना मदत होईल अशा प्रकारे एखादा पक्ष वागत असेल तर आपण हे सहन करणार नाही”, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नुकताच एक ब्लॉग लिहिला आहे. त्या ब्लॉगमध्ये अडवाणी यांनी “भाजपची स्थापना झाल्यापासून भाजपने कधीही आपल्या विचारधारेशी सहमत नसणाऱ्यांना शत्रू समजलेलं नाही. त्यांचा आम्ही फक्त विरोधक याच उद्देशाने विचार केला आहे”, असं त्यांनी म्हटलं. “विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या सहमत नसलेल्या कोणत्याही पक्षाला आम्ही देशद्रोही मानत नाही. भाजपची ती परंपरा नाही”, असेही लालकृष्ण अडवाणींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. या ब्लॉगचे उदाहरण देत फडणवीस यांनी “त्यांचे-आमचे विचार जुळत नाही, पण आमच्यात शत्रुत्व नाही. त्यामुळे आम्ही त्यांना देशद्रोही ठरवलेलं नाही.” असं स्पष्टीकरण दिलं.
त्याशिवाय नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात “अशा लोकांसोबत उभे राहिलेले किंवा त्यांच्यासाठी देशद्रोहाचा कायदा बदलण्यासाठी तयार झालेले सर्वच देशद्रोही असतील.” असे म्हटले होते. पण त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी “आम्ही त्यांना देशद्रोही ठरवलेलं नाही, पण जनता त्यांना देशद्रोही ठरवू शकते. पण, जर तुम्ही 124 A हा कायदा रद्द करणार असाल आणि त्याचा देशद्रोह्यांना फायदा होणार असेल. तर मात्र जनता त्यांना देशद्रोही म्हणू शकते”, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘एनकाऊन्टर’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना “काँग्रेसला तुम्ही देशद्रोही मानता का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ते काँग्रेसला देशद्रोही मानत नसल्याचं सांगितलं. मात्र “काँग्रेसची ही कृती देशद्रोह्यांना मदत करणारी आहे, हे मात्र मी मानतो”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्पष्ट केले.
पाहा व्हिडीओ :