राजन साळवी यांना भाजपची ऑफर होती, नाकारली म्हणूनच…सुषमा अंधारे यांचा खळबळजनक आरोप
ठाकरे गटाशी संबंधित सुरज चव्हाण यांना ईडीने रात्री अटक केली. त्यानंतर आज सकाळीच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर धाड मारून छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाने या कारवाई विरोधात संताप व्यक्त केला आहे. ही सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 18 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने छापेमारी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या छापेमारीनंतर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही कितीही छापेमारी केली, मला तुरुंगात टाकलं तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे. या छापेमारीनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी सुषमा अंधारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राजन साळवींना भाजपच्या ऑफर आल्या. मात्र ते निष्ठावंत राहिले, असा गौप्यस्फोट करतानाच या आधी पण राजन साळवी यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या. मात्र काही सापडलं नाही, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी भाजपला भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून चांगलंच घेरलं. पीएम फंडाचे काय झालं? अनेकांनी देणग्या दिल्या होत्या त्या पीएम केअर फंडाचे काय झालं? पीएम केअर फंड जर खासगी आहे तर त्यावर तुम्ही गप्प का बसला? असा फंड जमा करता येतो का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
किती लोकांनी माफीची मागणी केली?
सुरेश कुटेंवर बीडमध्ये धाड पडली. कुटे ग्रुपचे ते मालक होते. धाड पडल्यानंतर पाचव्या दिवशी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थांबली. यावर व्हिडिओ स्पेशालिस्ट का बोलत नाही? असा सवाल करतानाच भावना गवळी, यशवंत जाधव आदी नेते जर निर्दोष असतील तर यातील किती लोकांनी अब्रू नुकसानाची दावा केला किंवा माफी मागण्याची मागणी केली आहे, असा सवालही त्यांनी केला.
त्यानंतर लगेच कारवाई होते
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे भाजपसोबत गेले. राष्ट्रवादीत फूट पडली. याच भाजपने ललित पाटील प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा आम्ही काही मोठ्या गोष्टी करतो, तेव्हा तेव्हा भाजप सुडबुद्धीने कारवाई करते. दोन दिवसांपूर्वी आम्ही जनता दरबार घेताच भाजपला हादरे बसले. त्यानंतर सुरज चव्हाण आणि राजन साळवींवर कारवाई करण्यात आली, असा दावा त्यांनी केला.
तो घोटाळा खरच आहे काय?
ज्या खिचडी घोटाळ्याचा आरोप केला जातो, तो खरंच खिचडी घोटाळा झाला आहे का? लोकांना वाचवणं यांची प्राथमिकता होती, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी खूप चांगलं काम केलं. कोरोना काळात उत्तरप्रदेशात गंगेत प्रेते वाहत होती, गुजरातमध्ये रस्त्यावर मृतदेह टाकले जात होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवले. कुटुंबप्रमुखासारखी त्यांनी काळजी घेतली, असंही त्या म्हणाल्या.