कोल्हापूर पासिंगची BMW ; 10 कोटींच्या ठेवी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती ?
आदित्य ठाकरे यांच्याकडे बीएमडब्ल्यू कार, दोन व्यावसायिक प्रॉपर्टी, शेत जमिनीचा प्लॉट अशी मालमत्ता आहे.
मुंबई : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांची संपत्ती (Aditya Thackeray Affidavit Property) उघड झाली आहे. आदित्य यांच्याकडे 11 कोटी 38 लाख रुपये संपत्ती असल्याचं प्रतिज्ञापत्रात समोर आलं आहे. मोठं शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांनी वरळीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
आदित्य ठाकरे यांच्याकडे 2010 चं मॉडेल असलेली एक बीएमडब्ल्यू कंपनीची आलिशान कार आहे. या गाडीचं पासिंग कोल्हापूरचं (MH -09) आहे. बँकेत दहा कोटींपेक्षा अधिक ठेवी असून 64 लाखांचे दागिने आहेत. याशिवाय दोन व्यावसायिक प्रॉपर्टी, शेत जमिनीचा प्लॉट अशी मालमत्ता (Aditya Thackeray Affidavit Property) आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एकाही गुन्ह्याची नोंद नाही.
आदित्य ठाकरेंची मालमत्ता आणि किंमत
बँक ठेवी – 10 काेटी 36 लाख रुपये
बॉन्ड शेअर्स– 20 लाख 39 हजार रुपये
वाहन – BMW कार (MH -09 CB -1234) 2010 – किंमत अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये
दागिने– 64 लाख 65 हजार
इतर – 10 लाख 22 हजार
एकूण – 11 काेटी 38 लाख
दोन व्यावसायिक प्रॉपर्टी – अंदाजे साडेतीन कोटी रुपये
कर्जत खालापूरला एक शेतजमिनीचा प्लॉट – अंदाजे 44 लाख रुपये
वरळीत नामांकन अर्ज
आदित्य ठाकरे सकाळी दहा वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’ निवासस्थानाहून उमेदवारी अर्ज भरायला रवाना झाले. लोअर परळ येथील ‘शिवालय’ या शिवसेना शाखेतून ते बीडीडी चाळ-वरळी नाका मार्गे निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरुन आले. आदित्य ठाकरे अर्ज भरताना वडील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरत आहे. त्यांना काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अप्रत्यक्ष साथ लाभली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार नाही. राज ठाकरे यांनी स्वत: हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळीतून गौतम गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गायकवाड हे माजी पोलिस अधिकारी आहेत. आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे घटनातज्ञ अॅड. सुरेश माने हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंनी मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीत शक्तीनिशी उडी घेतल्याचं बोललं जात आहे. भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत घोषणेनंतर आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी असलेले सचिन अहिर शिवसेनेत सामील झाल्यामुळे वरळीतून लढताना आदित्य ठाकरेंच्या बाहूत अधिक बळ आलं आहे. मनसेनेही तलवार म्यान केल्यास मराठी मतं आदित्य ठाकरेंना मिळतील, यात शंका नाही. त्यातच गुजराती आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये पोस्टरबाजी करत आदित्य ठाकरेंनी अमराठी भाषिकांनाही वळवण्याचा प्रयत्न केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताना ठाकरे कुटुंबीयांसह शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. परंतु उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर बंडोबांना शांत करत असल्यामुळे लेकाच्या ऐतिहासिक घोषणेचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होऊ शकले नाहीत.