ठाणे : युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) 15 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी आज राज्यभरातून हजारो शिवसैनिक आणि युवासैनिक अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. ठाण्यातील शिवसैनिकही आज अयोध्या स्पेशल ट्रेननं अयोध्येसाठी (Ayodhya) रवाना झाले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यकर्ते रवाना झाले, त्यांच्यासोबत टीव्ही 9 मराठीची टीमही रवाना झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरुन ही स्पेशल रेल्वे रवाना झाली. दुपारच्या सुमारास अयोध्येला जाणारी स्पेशल ट्रेन (Special train)आल्यानंतर, ठाणे रेल्वे स्टेशनवर युवा सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे त्यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर जोरदार घोषणाबाजी केली. ‘घर में बैठा है नकली, अयोध्या जा रहा है असली’, अशा उपहासात्मक घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. शिवसेनेला कुणी हिंदुत्त्व शिकवू नये, भगवी शाल पांघरून कुणी बाळासाहेब होत नाही, अशी टीकाही यावेळी राज ठाकरे यांच्यावर करण्यात आली.
आदित्य ठाकरे 15 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा दौरा कसा असेल याचं वेळापत्रक समोर आलंय. त्यानुसार…
>> सकाळी 11 वा. – लखनऊ विमानतळावर आगमन
>> दुपारी 1.30 वा. – अयोध्येत आगमन, हॉटेल पंचशीलमध्ये थांबणार
>> दुपारी 3.30 वा. – पत्रकार परिषद घेणार
>> संध्याकाळी 4.45 वा. – इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी जाणार
>> संध्याकाळी 5.30 वा. – श्री राम जन्मभूमीवर जात रामलल्लाचं दर्शन
>> संध्याकाळी 6.30 वा. – शरयू नदी किनारी महाआरतीमध्ये सहभागी होणार
>> संध्याकाळी 7.30 वा. – लखनऊसाठी प्रस्थान
दरम्यान, 5 जून रोजी शिवसेना खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई अयोध्या दौऱ्यावर होते. आदित्य ठाकरे यांच्या 15 जूनच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अयोध्येतील स्थितीचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा कसा असेल, किती वाजेपर्यंत चालेल, पत्रकार परिषद कुठे असेल, तसेच ते कुठे उतरतील आदींचा आढावा त्यांनी घेतला होता. राऊत यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. तसेच राम मंदिर निर्माण होत असलेल्या परिसराची पाहणीही केली. 15 जून रोजी लखनऊपासून ते अयोध्येपर्यंत आदित्य ठाकरेंचं स्वागत होणार आहे. पण हे कोणतंही राजकीय शक्ती प्रदर्शन नसेल. ही श्रद्धेची भावना असेल, असं संजय राऊत त्यावेळी म्हणाले होते.