आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी, संध्याकाळी शरयू तीरावर महाआरती, राऊतांनी सांगितला उत्तर प्रदेश दौऱ्याचा कार्यक्रम!
अयोध्येत आम्ही 35 वर्षांपासून येतोय. हनुमानगढीलाही येतोय. कुणी हनुमान चालिसाचं पुस्तक घेऊन आम्हाला राजकारण शिकवू नये. हनुमान गढींच्या विश्वस्तांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे केलं आहे, मात्र प्रत्येकाचे वैचारिक मतभेद असतात, ते फार गंभीर नाहीत, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
लखनौ: शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा आज अयोध्या दौरा असून उत्तर प्रदेशात याची जय्यत तयारी झाली असल्याचं आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. अयोध्येत आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची लखनौपासून (Lakhnow) अयोध्येपर्यंत तयारी झाली आहे. कोणत्याही राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नसून अयोध्येतील रामलल्लांच्या दर्शनाची आमची परंपराच आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठणासाठी केलेल्या आंदोलानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं अयोध्या दौरा आयोजित केल्याची टीका केली जातेय. शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलंय जातंय, याला उत्तर देताना संजय राऊतांनी हे उत्तर दिलं.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी सांगितलं की, आदित्य ठाकरे सकाळी 10.30 ला लखनौला उतरतील आणि अयोध्येत येतील. त्यापूर्वी ते इस्कॉन मंदिराला भेट देतील. राम लल्लांचा दर्शन हा महत्त्वाचा भाग आहे. संध्याकाळी शरयू तीरावरची आरती हा नेत्रदीपक सोहळा आहे. कालच शरयूचा प्रकटदिन होता. तीन दिवस उत्सव साजरा झाला, आज शरयूच्या पूजेचा उत्सव आहे. अयोध्येत आम्ही 35 वर्षांपासून येतोय. हनुमानगढीलाही येतोय. कुणी हनुमान चालिसाचं पुस्तक घेऊन आम्हाला राजकारण शिकवू नये. हनुमान गढींच्या विश्वस्तांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे केलं आहे, मात्र प्रत्येकाचे वैचारिक मतभेद असतात, ते फार गंभीर नाहीत, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा कसा?
- 1.30 वाजता अयोध्येत आगमन होईल.
- 3.30 वाजता पत्रकार परिषद घेतील
- 4.45 वाजता इस्कॉन मंदिरात दर्शन घेतील
- 5.30 वाजता राम लल्लांचे दर्शन घेतील
- 6.30 वाजता शरयू तीरावर महाआरती होईल
- 7.30 लखनौसाठी प्रस्थान करतील आणि तेथून मुंबईत परततील.
‘देशात हुकुमशाहीचं टोक गाठलं जातंय’
केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप नेतृत्वाकडून गैरवापर सुरु आहे, असा आरोप करताना संजय राऊत म्हणाले, ‘ पक्षवाढीसाठी काम करणाऱ्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देत आहेत. राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात रात्री १२ वाजेपर्यंत चौकशी होतेय. ही हुकुमशाहीची सुरुवात नाही तर हुकुमशाहीचं टोक गाठलंय. आपली सत्ता टिकवण्यासाठी एवढ्या जुलमी पद्धतीनं विरोधकांना चिरडण्याचं काम हिटलरनंही केलं नसेल. जगभरात हिंदुस्तानच्या लोकशाहीचे जगभरात दाखले दिले जातात. त्या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात आहे. हा आमच्या स्वातंत्र्याचा पराभव आहे. तो पराभव भाजपच्या नेतृत्वाखाली करतंय. त्यामुळे आणखी एका स्वातंत्र्याची लढाई आपल्याला करावी लागणार आहे. शिवसेनेचे सहकारी अनिल परब यांच्या कारकीर्दाचा अभ्यास केला तर ही केस त्यांच्यावर कोणत्या पद्धतीने लादली गेलीय, याच आश्चर्य वाटेल. राज्यसभा निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा वापर करून .. सुहास कांदे यांचं मत बाद करण्यापासून.. अडचणीत आणण्याचं काम केलं. देशातील कोणती यंत्रणा स्वतंत्र, निष्पक्ष नाही. न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत सगळेच दबावाखाली आहे. आमच्या सगळ्यांच्या बाबतीत हे सिद्ध होतंय. शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी साडेसात तास लावले. मुंबईतून निवडणूक आयोगाशी कोण बोलत होतं, काय सूचना, माहिती दिली जात होती, हे सगळं आम्हाला माहिती आहे.