आधी डिनर, आता एकाच दिवशी बर्थ डे, आदित्य ठाकरे-दिशा पटाणीचा योगायोग
दिशा उद्या तिचा 26 वा जन्मदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी आदित्य ठाकरेंचाही जन्मदिवस आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतीच ती युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबतच्या डिनरमुळे चर्चेत आली. दिशा उद्या तिचा 26 वा जन्मदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी आदित्य ठाकरेंचाही जन्मदिवस आहे. दोघांच्या मैत्रीविषयी कुणीही भाष्य केलेलं नाही, पण हे दोन मित्र एकाच दिवशी जन्मदिन साजरा करणार आहेत. आदित्य ठाकरेंचा हा 28 वा जन्मदिन आहे.
दिशा पटाणी कधी तिच्या हटके लूकमुळे, कधी कपड्यांमुळे, तर कधी अभिनेता टायगर श्रॉफमुळे चर्चेत असते. ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिशा तिचे फोटो शेअर करत असते. त्यावरुन तिच्याबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. शिवाय, अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या कथित अफेअरबाबत सुद्धा चर्चा होत राहते. मात्र, आता दिशा पटाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनरला गेल्याची दिसली. हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं.
खरं तर दिशा पटाणीचं नाव कायमच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं गेलं. मात्र, या दोघांनी कधीच त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चा केवळ ‘गॉसिप्स’च राहिली. आता आदित्य ठाकरेंसोबत डिनरला गेल्याने दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आदित्य ठाकरे सध्या राजकारणात अधिक सक्रीय झाले आहेत. युवासेनेचे प्रमुख या नात्याने त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरे सुरु केले आहेत. शिवसेनेच्या दैनंदिन कामात, निर्णय प्रक्रियेत आदित्य ठाकरे सहभागी होत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केली. विशेषत: मुंबईच्या विकासासंबंधी ते अधिक जागृत असतात.