…. म्हणून भरसभेत आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्याला स्टेजवर बोलवून सत्कार केला
कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नसल्याचा इशारा यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Buldana) यांनी दिला. शिवाय ही जनआशीर्वाद यात्रा नसून तीर्थयात्रा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी कर्जमाफी न झालेल्या एका शेतकऱ्यालाही आदित्य ठाकरेंनी व्यासपीठावर बोलावलं.
बुलडाणा : राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अजूनही मिळाली नाही. यावरुन सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray Buldana) सरकारवरच हल्ला चढवलाय. शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही त्याचा लाभ मिळाला नाही, असा आरोप करत सरसकट कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नसल्याचा इशारा यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Buldana) यांनी दिला. शिवाय ही जनआशीर्वाद यात्रा नसून तीर्थयात्रा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी कर्जमाफी न झालेल्या एका शेतकऱ्यालाही आदित्य ठाकरेंनी व्यासपीठावर बोलावलं.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरु आहे. यात्रा बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाली. जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या वतीने आदित्य यांना पारंपरिक पोशाख भेट देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवरच हल्ला चढवला. राज्यातील शेतकऱ्यांना अद्यापही संपूर्ण कर्जमुक्ती झाली नसल्याचा आरोप करत पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचं ते म्हणाले.
आदित्य ठाकरे स्टेजवर भाषण करताना उपस्थित शेतकऱ्यांशी संवादही साधत होते. आदित्य यांनी कर्जमुक्ती झाली का? आणि पीकविमा मिळाला का? प्रश्न विचारताच उपस्थितांमधून शेतकरी उठला आणि कर्जमुक्ती झाली नसून फक्त 10 टक्के शेतकऱ्यांनाच मिळाली असल्याचं सांगितलं. पीक विमा तर शेतकऱ्यांना मिळालाच नाही, अशीही तक्रार केली.
या शेतकऱ्याला आदित्य यांनी सरळ स्टेजवर बोलावून त्यांचा भगव्या रुमालाने आणि पुष्पगुछ देऊन सत्कार केला. शिवाय त्यांचे आशीर्वादही घेतले. मात्र आदित्य ठाकरे शेतकरी प्रकाश औतकार यांच्यासोबत संवाद करत असताना बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र शेतकऱ्याने स्टेजवरच खासदारांना बोट दाखवून थांबायला सांगितलं. यानंतर खासदारांनीही बोट दाखवलं. यावेळी मात्र सभेत बराच वेळ हशा झाला आणि चर्चाही सुरु झाली.
सुजलाम, सुफलाम, भ्रष्टाचारमुक्त, कर्जमुक्त, प्रदूषणमुक्त, बेरोजगारमुक्त, हिरवागार, भगवामय महाराष्ट्र घडविण्यासाठी ही जनआशीर्वाद यात्रा आहे. ही माझ्यासाठी तीर्थयात्रा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. खरं तर तीर्थयात्रा करायची असेल तर ती मंदिरात जाऊन करतात, मात्र लोकसभा निवडणुकीत जनतेने जो काही विश्वास शिवसेनेवर दाखवला आणि विजय मिळवून दिला, त्या लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे उद्गार आदित्य यांनी काढले.