वरळीतील उमेदवारीवर आदित्य ठाकरे म्हणतात…
मी जरी निवडणूक लढवली तरी शिवसैनिक म्हणून मतदान करा, असं आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलं आहे.
मुंबई : “मी जरी निवडणूक लढवली तरी शिवसैनिक म्हणून मतदान करा,” असं आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलं आहे. काल (22 सप्टेंबर) वरळीतील वाटमळू महाविद्यालयातील सभागृहात शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळावा (Shivsena) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेतून (Worli Constituency) निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.
वरळीमधील कार्यकर्ता मेळाव्यात आदित्य ठाकरे म्हणाले, “पेपर फुटण्यास वेळ आहे पेपर तपासणी सध्या सुरु आहे. पण मी निवडणूक लढवली तर शिवसैनिक म्हणून मतदान करा,” असे आवाहन करत आपण यंदा निवडणूक रिंगणात असून असे अप्रत्यक्ष संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले.
वरळी विधानसभा मतदारसंघात (Worli Constituency) आदित्य ठाकरे हेच उमेदवार असतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर यांनी कार्यकर्ता मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांना आता तरी वरळी विधानसभेचा पेपर फोडा असं आवाहन केले. मात्र “युतीचे चित्र स्पष्ट न झाल्याने सध्या पेपर तपासणी सुरु आहे. नंतरच खरे पेपर फुटतील”, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि वरळी विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार असणार अशी चर्चा सुरु झाली. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचा सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने पत्ता कट होणार का, असे प्रश्नही उपस्थित केले गेले. मात्र वरळीत सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन केले.
“सुनील शिंदे आणि मला शिवसेना वाऱ्यावर सोडणार नाही आमचे ही भलेच करेल,” असे सचिन अहिर म्हणाले. तसेच नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना आता तरी विधानसभा लढण्याचा पेपर मिडियासमोर फोडा, असे आवाहन केले.