‘त्यांनी’ बाळासाहेब ठाकरेंचं जेवणही काढलं होतं… राज ठाकरेंच्या नकलेनंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची नक्कल केल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर राज ठाकरे यांनीही स्पष्टीकरण दिलं.
मुंबईः गोरेगाव येथील मनसे गटप्रमुखांच्या मेळाव्याला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बंधू उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजारपणावरून केलेली नक्कल ठाकरे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही या टीकेबद्दल खंत व्यक्त केली. त्यांनी काहीही बोललं तरी मी त्यावर फार बोलणार नाही. माझे संस्कार तसे नाहीत. त्यांनी तर एकेकाळी आजोबांचं जेवणही काढलं होतं… अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. गोरेगाव येथील मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचीच नक्कल केली. तब्येतीचं कारण सांगून ते घरात बसत होते. एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून कांडी फिरवली तेव्हा कळलं. तेव्हा ते घरात बसत होते, पण आता सगळीकडे फिरतायत, असा टोमणा राज ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची नक्कल केल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर राज ठाकरे यांनीही स्पष्टीकरण दिलं.
ते म्हणाले, आरोग्याचं कारण सांगून जी व्यक्ती लोकांना भेटत नव्हती. मुख्यमंत्री पदावरून गेल्यावर हे सगळं व्यवस्थित झालं. ज्यावेळेला लोक सांगायचे, आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय… पण ते भेटत नव्हते. हा विषय आरोग्य किंवा प्रकृतीचा नाही. तर त्यामध्ये मला काय म्हणायचंय हे समजून घ्या, असं राज ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी मात्र राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ हे वक्तव्य ऐकून परिवार म्हणून आमच्या ज्या वेदना आणि दुःख आहे, त्यावर मी न बोललेलंच बरं. त्यातच माझे संस्कार दिसून येतील. मला आई-वडिलांनी असंच सांगितलंय. आम्ही त्यात जाणार नाही… मला आठवतंय, त्यांनी तर एकवेळ आजोबांचं जेवणही काढलेलं आहे. आम्ही काही दुःख गिळत जातो.. ती वेगळी गोष्ट आहे…