Devendra Fadnavis : त्याग केल्याशिवाय राज्य आणता येत नाही; फडणवीसांच्या बिटवीन द लाईनचा अर्थ काय?
Devendra Fadnavis : मला नागपूरकरांनी पाच वेळा निवडून दिलं. पाच वेळा आमदार झालो, दोनदा नगरसेवक झालो. महापौर झालो.
गजानन उमाटे, मुंबई: राज्यात भाजपचं सरकार आणल्यानंतर आणि उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) पहिल्यांदाच नागपुरात दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये त्यांचं प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोलताशे वाजवून भाजपच्या (bjp) हजारो कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांचं जोरदार स्वागत केलं. स्वत: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्या स्वागताला विमानतळावर आले होते. फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरात येणार असल्याने फडणवीस यांच्या पोस्टरने नागपूर नगरी नटली होती. त्यागी नेता अशी फडणवीसांची या पोस्टरमधून प्रतिमा तयार करण्यात आली होती. मात्र, नागपूरला येण्यापूर्वी फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. त्याग केल्याशिवाय राज्य आणता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. फडणवीस यांच्या विधानाचा अर्थ काय? असा सवाल केला जात आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामागची बिटवीन द लाईन तर सांगितली नाही ना? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
माझ्यामध्ये उत्साह तर आहेच पण जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे ठिक आहे. सर्वांचा उत्साह असल्याने स्वागत स्वीकारून लगेच कामाला लागणार आहे. कोणाची नाराजी आहे? काहींना काही त्याग करावा लागतो. त्याशिवाय आपलं राज्य आणता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांच्यासोबत बंडखोर राहिले पाहिजे. तसेच शिवसैनिकही शिंदे गटाच्या बाजून उभे राहिले पाहिजे, त्यासाठी तर शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही ना? फडणवीस यांच्या या विधानातील बिटवीन द लाईन ही तर नाही ना? अशी चर्चाही आता रंगली आहे.
हे काही आहे ते नागपूरकरांमुळेच
मला नागपूरकरांनी पाच वेळा निवडून दिलं. पाच वेळा आमदार झालो, दोनदा नगरसेवक झालो. महापौर झालो. आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा आलोय. नागपूरकर प्रेम व्यक्त करण्यासाठी आले. त्याबद्दल आभार मानतो. जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच आहे, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
कोर्टात योग्य ती बाजू मांडू
स्वागत स्वीकारत असताना मोठी जबाबदारी असल्याची जाणीव आहे. ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याचा आमचा संकल्प आहे, असं ते म्हणाले. 16 आमदारांना अपात्र करण्याच्या नोटिशीवरही त्यांनी भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयात योग्य ती बाजू मांडू. आम्ही योग्य प्रकारचं काम केल्याने योग्य तो निकाल येईल असं वाटतं. पण हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्याने आता त्यावर टिप्पणी करणं अयोग्य ठरेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रित बसून त्यावर निर्णय घेऊ. आमचा फायनल निर्णय झाल्यावर तुम्हाला सांगू, असंही ते म्हणाले.
सुगीचे दिवस येतील
यावेळी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यात नवं सरकार आल्याने छान वाटतंय. जे जरूरी होते महाराष्ट्रासाठी ते झालं आहे. शेतकरी आणि सामान्य माणसांसाठी झालंय त्याचा आनंद आहे. आता जनतेला नक्कीच सुगीचे दिवस येतील, असा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.