हरियाणा | 23 डिसेंबर 2023 : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचे नातू भाजप आमदार भव्य बिश्नोई पुन्हा एकदा चार्च्त आले आहेत. मार्च महिन्यात आमदार भव्य बिश्नोई आणि अभिनेत्री मेहरीन पिरजादा यांचा साखरपुडा झाला होता. मोठा थाटामाटात हा साखरपुडा झाला होता. परंतु, अवघ्या चार महिन्यातच या दोघांनी साखरपुडा तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याची राज्यात एकच चर्चा झाली होती. मात्र, भाजप आमदार भव्य बिश्नोई अखेर लग्न बंधनात अडकले आहे. त्यांची नव वधू एक आयएएस अधिकारी आहे.
आमदार भव्य बिश्नोई यांचा मार्च महिन्यात तामिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री मेहरीन पिरजादा हिच्यासोबत साखरपुडा झाला. मात्र, चार महिन्यातच त्यांची एंगेजमेंट तुटली. अभिनेत्री मेहरीन पिरजादा हिने याची घोषणा करताना म्हटले की भव्य बिश्नोई आणि मी दोघांनी मिळून आमची एंगेजमेंट तोडण्याचा आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून परस्पर संमतीने घेतला. त्यामुळे आता माझा भव्य, त्याचे कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींशी कोणताही संबंध नाही. आता मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. माझ्या भविष्यातील प्रोजेक्ट्समध्ये चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे असे तिने म्हटले होते.
आमदार भव्य बिश्नोई यांनीही एक स्टेटमेंट जारी करून लिहिले की, ‘दोन दिवसांपूर्वी मेहरीन आणि मी आमची एंगेजमेंट तोडण्याचा निर्णय घेतला. याचे कारण म्हणजे आपल्या विचार आणि मूल्यांमधील फरक. मला माहित आहे की मेहरीन आणि तिच्या कुटुंबाला प्रेम देण्यात मी कोणतीही कसर सोडली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
आमदार भव्य बिश्नोई आणि मेहरीन पिरजादा यांच्या या निर्णयानंतर आता भव्य यांच्या आयुष्यात एक आयएएस अधिकारी आली आहे. भव्य बिश्नोई यांनी आयएएस अधिकारी परी यांच्यासोबत सात फेऱ्या घेत मोठ्या थाटामाटात लग्न केले. राजस्थानमधील हॉटेल राफेल्समध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या शाही लग्नात भव्य बिश्नोई यांनी अतिशय सुंदर क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर, परी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
राजस्थान मध्ये झालेल्या या लग्न सोहळ्यानंतर आता नवी दिल्ली, हरियाणातील आदमपूर आणि राजस्थानमधील पुष्कर असा तीन ठिकाणी रिसेप्शन होणार आहे. याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि व्हीव्हीआयपी सहभागी होणार आहेत. 24 डिसेंबरला राजस्थानमधील पुष्करमध्ये पहिले रिसेप्शन होणार आहे. त्यानंतर दुसरे रिसेप्शन २६ डिसेंबरला हरियाणातील आदमपूर येथे होईल तर 27 डिसेंबरला दिल्लीत तिसरे रिसेप्शन होणार आहे.