मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे( Eknath Shinde) 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेलेत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर जयंत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमदार गुवाहाटीला जातील, असं वाटलं नव्हतं. पण, ते कसं काय जात आहेत, याचा अंदाज येत नाही. पण, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत, असं ते म्हणाले. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole))म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहेत. हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तुम्ही जे म्हणालं ते आम्ही करायला तयार आहोत. आजही काँग्रेसचे आमदार हे महाविकास आघाnडीसोबत आहेत, अशी ग्वाही दिली. आमची विरोधी पक्षात बसण्याची तयारी आहे. पण, सरकारला अजूनतरी धोका नाही, असं पटोले यांनी सांगितलं.
नाना पटोले म्हणाले, आमची कोणालाही काही जबरदस्ती नाही. आम्हाला लोकांनी विरोधात बसण्यासाठीच निवडून दिलंय. त्यामुळं आम्ही सत्तेत जातो म्हणून आम्ही गेलो नव्हतो. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो. आम्ही ताकाला जाऊन भांड लपवायचं काम करत नाही. आम्हाला विरोधी पक्षात बसायचं असेल तर आम्ही बसू. शिवसेनेला कुठं जायचं असेल किंवा कुणाला कुठं जायचं असेल तर जावं. आम्ही विरोधात बसू. पण, महाविकास आघाडी आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या अटी शर्ती मान्य करायला तयार आहेत. शिंदे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना वगळून सरकार हवंय. त्यासाठी भाजपसोबत युती करण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्लॅन आहे. संजय राऊतांनी तुम्ही परत या. हवं तर राष्ट्रवादी, काँग्रेसला वगळून सरकार स्थापन करू, असं आश्वासन दिलं. यासंदर्भातील निर्णय हा शिवसेनेला करायचा आहे. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.